आता "प्री मॅटर्निटी' फोटो शूटची क्रेझ ; निसर्गरम्य स्थळांना पसंती

सतीश जाधव
Sunday, 9 August 2020

नवदांपत्यांकडून या फोटोशूटला मागणी वाढली आहे.

बेळगाव - आयुष्यभराची आठवण म्हणून पूर्वी फक्‍त लग्नातले फोटो काढण्याचा रिवाज होता. मात्र, अलीकडच्या काळात "प्री वेडिंग'चे फॅड वाढले आहे. त्यानंतर आता "प्री मॅटर्निटी' फोटोशूटची क्रेझ आली आहे. 

नवदांपत्यांकडून या फोटोशूटला मागणी वाढली आहे. निसर्गरम्य स्थळांवर जाऊन हे फोटो काढले जात असून त्यासाठी मुबलक पैसाही खर्च केला जात आहे. त्यामुळे, फोटोग्राफरांनाही चांगले दिवस आले आहेत. 

पहिल्या बाळाचे कौतुक सर्वांनाच असते. पण, आतापर्यंत बाळ जन्मल्यानंतरच फोटो काढण्याची पद्धत रुढ होती. पण, आता गरोदरपणाची आठवण कायम राहावी म्हणून प्री मॅटर्निटी फोटोशूटचे प्रमाण वाढले आहे. तसे पाहिल्यास गर्भवती महिलेला बाळाचा जन्म होईपर्यंत नऊ महिने विशेष काळजी घ्यावी लागते. तरीसुद्धा गरोदरपणातील सातव्या ते आठव्या महिन्यात फोटोशूट केले जात आहेत. 

अनेक नवीन जोडपी या फोटोशूटसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. तसेच बाळ जन्मल्यानंतर पुन्हा बेबी फोटोशूट केले जाते. 

शिक्षित लोकांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. व्हॅक्‍सिन डेपो, मंडोळी रोड, महिपाळगड, भुतनाथ डोंगर, तिलारी, स्वप्नवेल पॉईंट आदी लोकेशन्सल प्राधान्य दिले जात आहे. फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर उच्च दर्जाचे कॅमेरे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. पावसाळ्यानंतर काही दिवस चांगली हिरवळ असते. त्यामुळे प्री मॅटर्निटी तसेच इतर फोटोशूट याच काळात अधिक होत आहे. 

हे पण वाचाया गावात नाही एकही बेरोजगार तरूण; या व्यवसायातून बनविली गावाची ओळख

"बेळगाव शहरात सध्या प्री मेटर्निटी फोटोशूटचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणातील आठवणी ताज्या ठेवण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे. बेळगाव शहराच्या आसपास असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी हे शूट केले जात आहे. त्यासाठी फोटोग्राफरांनाही चांगल्या प्रतिचे कॅमेरा व लेन्स वापरावे लागतात.' 

- डी. बी. पाटील, फोटोग्राफर 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre maternity photo shoot craze