कोरोना पॉझिटीव्ह-निगेटीव्हच्या घोळात गर्भवतीची हेळसांड 

बलराज पवार 
Thursday, 10 September 2020

कोरोनाची अँटीजेन चाचणी पॉझिटीव्ह आल्याने तणावग्रस्त झालेल्या गर्भवती महिलेची पुन्हा खासगी प्रयोग शाळेत चाचणी केली.

सांगली : कोरोनाची अँटीजेन चाचणी पॉझिटीव्ह आल्याने तणावग्रस्त झालेल्या गर्भवती महिलेची पुन्हा खासगी प्रयोग शाळेत चाचणी केली. ती निगेटीव्ह आल्यानंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आणि तिची सुखरुप प्रसुती झाली. कॉंग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण कोरोनाच्या अहवालाच्या घोळात हेळसांड होत असलेल्या गर्भवतीच्या कुटुंबियांच्या मदतीस धावून आल्याने त्यांना आधार मिळाला. 

एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले. पण, तेथील डॉक्‍टरांनी आधी कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. अँटीजेन चाचणी करण्यासाठी या कुटुंबाने नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क केला. श्री. चव्हाण यांनी महापालिकेच्या रुग्णालयात नेऊन तेथे ही चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे गर्भवती महिला कोरानाबाधित असल्याचा समज तिच्या कुटुंबियांचा झाल्याने ते हादरुन गेले. त्यांना धक्का बसला. मात्र मंगेश चव्हाण यांनी त्यांना धीर देत पुन्हा खासगी प्रयोगशाळेत चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. 

अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने हे कुटुंब दिवसभर तणावाखाली होते. त्यातच खासगी प्रयोगशाळेत या गर्भवती महिलेचा स्वॅब देण्यात आला. त्याचा अहवाल दुसऱ्या दिवशी आला. पण, तो निगेटिव्ह होता. त्यामुळे या कुटुंबाला हायसे वाटले. त्यानंतर हा अहवाल घेऊन कुटुंबियांनी प्रसुतीसाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. या महिलेची सुखरुप प्रसुती झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र आता अँटिजेन चाचणी खरी, की लॅबची चाचणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याबरोबरच आणखी एका घटनेत महापालिकेच्याच एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. मात्र त्याला दिवसभर कुठल्याही रुग्णालयात बेडही उपलब्ध झाला नाही. शेवटी या कर्मचाऱ्याला होम आयसोलेशन करण्यात आले. त्यातच मिरजेतील स्वच्छता निरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता राबणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. यावर मंगेश चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnancy care in a mixture of corona positive-negative