
खून करून आत्महत्येचा बनाव करणारा संशयित पती विठ्ठल बलभीम महानुरे पसार झाल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की हा खून चारित्र्याच्या संशयावरून झाला आहे.
गर्भवती पत्नीचा खून करुन पती झाला पसार...
वडणगे (कोल्हापूर) - आठ दिवसांपूर्वी वडणगे (ता. करवीर) येथे राहायला आलेल्या तीन महिन्यांच्या गर्भवतीचा मारहाण करून आणि गळा दाबून खून करण्यात आला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सारिका विठ्ठल महानुरे (वय २२, सध्या रा. वडणगे, मूळ रा. डाळिंब, जि. उस्मानाबाद) असे त्यांचे नाव आहे. खून करून आत्महत्येचा बनाव करणारा संशयित पती विठ्ठल बलभीम महानुरे पसार झाल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की हा खून चारित्र्याच्या संशयावरून झाला आहे.
चारित्र्याच्या संशयावरून कृत्य
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी या प्रकरणी विजय रामचंद्र सुभेदार (मूळचे रा. पेठ सांघवी, उमरगा जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. ते २५ वर्षांपासून कुटुंबाबरोबर येथे राजोपाध्येनगरात स्थायिक झाले आहेत. ते खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांची मोठी मुलगी सारिका यांचा जून २०१९ मध्ये विठ्ठल बलभीम महानुरे (वय ३०) याच्याशी झाला. तो मूळचा डाळिंब येथे राहतो. त्याच्या घरची मंडळी धार्मिक आणि नात्यातील असल्याने त्याला कोणी हरकत घेतली नाही. तो हॉटेलमध्ये आचारीचे काम करतो. काही दिवसांपर्यंत तो दौंड येथे नोकरीसह होता; मात्र त्याला दारूचे व्यसन होते. तो चारित्र्यावर संशयही घेत होता. त्यामुळे दाम्पत्यात नेहमी खटके उडत होते. त्यांच्यातील वाद अनेकदा मिटविण्यात आले होते.
वाचा - मुलीच्या आग्रहासाठी घरात होता 26 बेवारस मांजराचा वावर अन्...
दरम्यान, सारिका महानुरे तीन महिन्याच्या गर्भवती असल्याचे नातेवाईकांना समजले. त्यांच्या लग्नात मध्यस्थी केलेले वडणगेतील नातेवाईक राजू महानुरे यांनी विठ्ठलला आपल्याकडे बोलवून घेतले. त्याला इथे काही तरी काम देऊन त्याच्या संसाराची घडी व्यवस्थित बसविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आठ दिवसांपूर्वी तो पत्नी सारिकासोबत त्यांच्या घरी राहण्यास आला. महानुरे यांच्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर ते दोघे राहत होते. आज सकाळी विजय सुभेदार यांनी आपली मुलगी सारिका हिला फोन केला; मात्र तिचा फोन बंद लागला. त्यानंतर त्यांनी पती विठ्ठल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचाही फोन बंद होता. त्यामुळे सुभेदार यांनी नातेवाईक राजू यांना फोन करून विचारणा केली. राजू यांनी दुसऱ्या मजल्यावर जावून पाहिल्यानंतर सारिका बेडवर मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ तिच्या वडिलांना याची माहिती दिली. खुनाची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यांनी मोठा आक्रोश केला. तशी बघ्यांची गर्दी वाढू लागली. त्यांच्याकडून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात होते. पोलिस तपासातही या गर्दीचा अडथळा येत होता.
करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निरीक्षक सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांच्यासह पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला. येथेही नातेवाईकांनी गर्दी केली होती. याबाबत वडील विजय सुभेदार यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित पती विठ्ठल महानुरेवर खूनाचा गुन्हा नोंद झाला. मृत सारिका महानुरे या बीए पदवीचे शिक्षण घेत होत्या. त्यांना योगेश व रुपेश असे दोन लहान भाऊ आहेत.
आत्महत्येचा बनाव
बेडवर पडलेल्या सारिका महानुरे यांच्याबरोबर वर फास लावलेला दोर लटकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा खून नसून आत्महत्या असल्याचा बनाव निर्माण करण्याचा प्रयत्न संशयित पतीने केला असावा, असा संशय पोलिसांना आला. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला.
थांब्यापर्यंत श्वान घुटमळले
घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्याला कपड्याचा वास देण्यात आला. यानंतर श्वान महानूर रहात असलेल्या खोलीत घुटमळत जवळच्या बस थांब्यापर्यंत जाऊन घुटमळले. त्यामुळे खुनानंतर मारेकरी बसमधून पसार झाला असावा, अशी शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करीत आहेत.