पंतप्रधानांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे 'हे" माजी खासदार होणार भाजपवासी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 August 2019

कोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठा धक्का समजला जातो. 

कोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठा धक्का समजला जातो. 

दरम्यान, भाजप प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी श्री. महाडिक मुंबईला गेले आहेत. ते आज (ता. २७) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी प्राथमिक चर्चा करतील. त्यात त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. आपला प्रवेश पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

लोकसभेत प्रचंड काम करूनही श्री. महाडिक यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दारूण पराभव झाला. या निवडणुकीत दोन्हीही काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी मदत न केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातूनच ते पक्षावर नाराज आहेत. मुळात लोकसभेलाही त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊ नये, अशी त्यांच्या जवळचे मित्र व नातेवाईक यांची इच्छा होती. तथापि, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील प्रेम व निष्ठेपोटी त्यांनी ही उमेदवारी स्वीकारली होती. 

भाजपमध्ये पक्षीय पातळीवरील मोठी जबाबदारी देण्याच्या अटीवर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाल्याचे समजते. पक्षात राज्य पातळीवरील त्यांना मोठे पद देण्याचा शब्द पालकमंत्री पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी कुटुंबासह भाजपात प्रवेश करण्याबरोबरच युवा शक्तीचे अस्तित्वही विसर्जित करण्याची अट घालण्यात आल्याचे समजते.

सोलापूरच्या सभेत प्रवेश शक्‍य
भाजपच्या महाजनादेश यात्रेची सांगता ३१ ऑगस्टला सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात श्री. महाडिक यांचा कारखाना आहे. यानिमित्ताने त्यांचे कार्यक्षेत्रही या जिल्ह्यात येते. त्यामुळेच सोलापुरात भाजप प्रवेश करण्याची तयारी श्री. महाडिक यांच्याकडून सुरू असल्याचे बोलले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the presence of the Prime Minister Dhananjay Mahadik will enter in BJP