‘बार’ अध्यक्ष निवड, वातावरण गरम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

कार्यकारिणी म्हणते योग्य निर्णय; माजी अध्यक्षांकडून आक्षेप
 

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. दिनेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नियमाला धरून आणि कायद्याच्या चौकटीत श्री. पाटील यांची निवड केल्याचा दावा बार असोसिएशन कार्यकारणीचा आहे. पण, त्याला माजी अध्यक्षांसह वकिलांनी आक्षेप घेतला आहे. नियमाला धरून निवड झाली नाही. त्यामुळे श्री पाटील यांनी पायउतार व्हावे, असा आग्रह धरला आहे. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवरून न्यायालयाचे वातावरण चांगलेच गरम झाले आहे.

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्याजागी बार असोसिएशन कार्यकारणीतर्फे ॲड. पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड घोषित केली. पाटील यांनी अध्यक्षपदाची सुत्रेही नुकतीच स्वीकारली. पण, या निवडीला बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी आक्षेप घेतला. विद्यमान कार्यकारणीपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करता येते. बार असोसिएशनच्या कोणत्याही सदस्याला किंवा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला अध्यक्ष होता येत नाही. यामुळे पाटील यांची निवड नियमबाह्य असल्याचा आरोप करत निदर्शने केली. ठिय्या आंदोलन करत राज्य बार परिषदेकडे तक्रार केली आहे. 

हेही वाचा- मराठी भाषिकांना बसणार फटका  : बेळगावात पुनर्रचना नाहीच -

दुसरीकडे कार्यकारणीने ॲड. पाटील यांची निवड योग्य आणि बायलॉला धरून असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पूर्ण अभ्यास करून निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाटील पुढील कालावधीत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील, अशी माहिती दिली. 

नियमाला धरून आणि बायलॉप्रमाणे ॲड. दिनेश पाटील यांची निवड बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी झाली आहे. याबाबत पूर्ण अभ्यास करून कार्यकारिणी समितीने निर्णय घेतला आहे. यामुळे पाटील यापुढे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
ॲड. गजानन पाटील उपाध्यक्ष, बेळगाव बार असोसिएशन संघ

बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. दिनेश पाटील यांची निवड नियमबाह्य आहे. बायलॉमध्ये विद्यमान कार्यकारणीपैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाऊ शकते. पण, कार्यकारिणीने बार असोसिएशनच्या सदस्याची निवड केली आहे. या विरोधात राज्य परिषदेकडे तक्रार केली असून उत्तराची प्रतीक्षा आहे.
ॲड. एस. एस. किवडसण्णावर, माजी अध्यक्ष, बेळगाव बार असोसिएशन

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Belgaum Bar Association Adv. Dinesh Patil has been selected