अबब... मटनाचा भाव वाढता वाढता वाढे...

मिलिंद गिरमे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

-  अलीकडच्या काळात मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढली

- मासेमारीत मासे मिळण्यात घट झाली आहे

- चामड्याचा दर 250 वरून 10 रुपयांवर आल्यामुळे मटन भाव वाढले

लवंग (माळशिरस, जि. सोलापूर) : आठवड्यातील मांसाहार करण्याचे जे दिवस-वार असतात त्यादिवशी मटन, चिकन, मच्छीच्या विक्री दुकानात हमखास खवय्यांची गर्दी असते.परंतु, गेल्या काही आठवड्यांपासून मटनाचे वाढत असलेले भरमसाट दर पाहून मटनप्रेमींची कुचंबणा होत आहे. 

मांसाहार करणाऱ्यांमधील कित्येकांचा मटन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. 
मात्र, मटनाचा किलोचा दर 570 रुपयांपर्यंत पोचल्यामुळे मटनाऐवजी चिकन किंवा मच्छीवर ताव मारून  मांसाहाराची हाऊस-इच्छा भागवण्याची वेळ मटनप्रेमींवर आली आहे. 

मटनाचे भाव दिवसेंदिवस वेगाने का वाढत चालले आहेत असा सर्वात मोठा प्रश्‍न मटनप्रेमींसमोर आहे. खरंतर मटनाचे नाव जरी घेतले तरी काळा तांबडा मसाला घालून झणझणीत बनवलेल्या मटनाचे ताट डोळ्यासमोर तरळून जाते आणि तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर मटन खायला बसल्यावर हाताला ओघळ येईपर्यंत आणि मटनाचा रस्सा वरपून खाल्लेशिवाय जेवण केल्याचे समाधान मिळत नाही. 

अलीकडच्या काळात मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. 
वेगवेगळ्या वर्गातील काही कामानिमित्त परगावी घराबाहेर पडणारे लोक 
जेवणात मांसाहार आणि त्यात मटनाला प्राधान्य देतात. तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे गोमांस खाणारे लोक मटन आणि चिकनकडे वळले आहेत तर शरीरात बी- ट्‌वेल या विटामिन घटकाची कमतरता मांसाहार सेवनातून भरून निघते 
असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात असल्यामुळेही मटन खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे धरणे, नद्या तुडुंब भरली आहेत आणि हिवाळ्यात समुद्रातील मासे खोलवर तळाशी जात असल्यामुळे मासेमारीत मासे मिळण्यात घट झाली आहे. पर्यायाने मासे खाणारे मटनाकडे वळले आहेत. साहाजिकच अशा विविध कारणांमुळे मटनाची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. 

मटन विक्रेतेच्या म्हणण्यात येते की, शेळ्या, बकरे, बोकड यांच्या चामड्याची निर्यात बंद केल्याने चामड्याच्या फॅक्‍टरीकडून मागणी कमी झाल्यामुळे चामड्याची विक्री कमी झाली आहे. चामड्याचा दर 200-250 रुपयांवरून फक्त 10 रुपयांवर आल्यामुळे मटन विक्रेत्यांनी मटनाचे भाव वाढवले आहेत. 

कोल्हापूर, सांगलीमधील पुरामध्ये शेळ्या-मेंढ्या, बोकडांचा बळी मोठ्या प्रमाणात 
गेल्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. तसेच तिकडचे व्यापारी आजूबाजूच्या 
गावातून बोकड, मेंढ्यांची खरेदी करत असल्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. 
कमी पुरवठ्यामुळेही मटनाचे दर वाढले आहेत. 

कोल्हापूर, सांगलीतील पुरामध्ये शेळ्या, बोकडं, मेंढरं मेल्यामुळे तिकडचे व्यापारी इतरत्र जाऊन शेळ्या-मेंढ्या खरेदी जादा दराने करतात तर कातड्याला दर मिळत नसल्याने मटनाचा दर वाढवावा लागला. दरवाढ करूनही बोकडामागे फक्त 300 ते 400 रुपये मिळतात. 
- रमेश माणिकराव बेंद्रे, मटन विक्रेता, माळीनगर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of meat Rs 570