
सांगली-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नवीन राजापुरी हळद सौद्याला आज प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या हळदीला 17 हजार रूपये इतका उच्चांकी भाव मिळाला. पहिल्याच दिवशी 9 हजार 232 हळद पोत्यांची विक्री झाली.
प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यांपासून हळद काढणीला सुरुवात होते. जानेवारीच्या पंधरावड्यात बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना सुरुवात केली जाते. गतवर्षी महापुरामुळे हळदीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा महिनाभर उशिराने हळदीच्या सौद्यांना सुरूवात झाली आहे. नुकतेच नवीन हळद काढलीला सुरुवात झाली असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने आज मुहूर्तावर हळदीचा सौदा घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हळद उत्पादक आणि व्यापारी यांना उत्सुकता होती.
आजच्या सौद्यामध्ये बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी राजेंद्र गणपती शिनगारे यांच्या हळदीला क्विंटलला 17 हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला.
जयश्रीराम ट्रेडर्स यांच्या दुकानात शेतकरी शिनगारे यांच्या कलमाची खरेदी प्रति क्विंटल 17 हजार रुपयेप्रमाणे श्रीराम मालू यांनी केली. तसेच पहिल्याच दिवशी मार्केट यार्डात 9 हजार 232 पोत्यांची विक्री झाली. राजापुरी हळदीला कमीत कमी सहा हजार रूपये आणि जास्तीत जास्त 17 हजार रुपये क्विंटल इतका दर मिळाला.
सांगलीची हळद पेठ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश, बेळगाव, विजापूरसह शेजारच्या सीमाभागातील हळद सांगली बाजार समितीकडे विक्रीसाठी येते. जिल्ह्यात मागील काही वर्षापासून हळद लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. पाच वर्षापूर्वी हळदीला पंधरा हजार रुपये क्विंटल दर मिळत होता. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी हळदी उत्पादनाकडे आकर्षित झाले होते. परंतू उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना विशेष दर मिळालेला नाही. गेल्या तीन वर्षात सहा ते आठ हजारापर्यंत दर शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे.
आज सकाळी गणपती जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेत नवीन राजापुरी हळदीच्या सौद्यांना सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते प्रारंभ झाला. उपसभापती तानाजी पाटील, संचालक शितल पाटील, मुजीर जांभळीकर, हळद प्रसिद्ध हळद व्यापारी मनोहर सारडा, गोपाळ मर्दा, सत्यनारायण अटल, रतीलाल विरजीभाई, रोहन नरवाडे, बाजार समितीचे सचिव आर. ए. पाटील आदी उपस्थित होते.
.
""हळद उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी. शेतकऱ्यांनी हळद शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.''
-दिनकर पाटील (सभापती, बाजार समिती)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.