पृथ्वीराज चव्हाणांना ज्योतिषाचा धंदाच करावा लागेल : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दुटप्पी आणि स्वार्थांध कार्यशैलीमुळेच कित्येक जणांनी कॉग्रेस आघाडीच्या बुडत्या जहाजातुन केव्हांच उडी मारली आहे असा टाेला देखील उदयनराजेंनी लगावला आहे.

सातारा : भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालता घालता, त्यांच्यातीलच एक होवू पहाणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचा दोन लाखांनी पराभव होण्याचे नुकतेच भाकित केले. आमच्याबाबत जनता जनार्दन कौल देणार आहे. मात्र मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांची भुमिका आणि आज उमेदवार म्हणून असलेली भुमिका यात त्यांनी मुलभुत फरक करुन, स्वार्थी दुटप्पी भुमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघातील बहुतांशी व्यक्‍तींनी, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या दोस्ताला दोन-चार लाथा घालुन, मतदार संघातुन हाकलुन देण्याचा निर्धार आमच्याकडे व्यक्‍त केला आहे. त्यांनी, त्याची चिंता करावी, आमची चिंता नको अशा शब्दांत सातारा लोकसभा मतदार संघाचे भाजपा-सेना,मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला आहे.
 
पृथ्वीराज चव्हाण यांनीच राज्य सहकारी बॅंक घोटाळयांबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार संचालक असलेल्या राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळ बरखास्त करुन, चौकशी लावली होती या वस्तुस्थितीचा उदयनराजेंनी पुनुरुच्चार केला.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या भ्रष्टाचा-यांना चाप बसावा, पुन्हा सहकारी साखर कारखान्यांचे खाजगीकरण होवू नये यासह भ्रष्टाचार उघड व्हावा म्हणून चौकशी लावणारे पृथ्वीराज चव्हाण, आज राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वळचणीला जावून, भ्रष्टाचा-यांची पाठराखण करीत आहेत. त्यांची ही दुटप्पी भुमिका मतदारसंघातील कोणालाही पटणारी नाही. त्यामुळेच त्यांच्याच मतदार संघातील काही व्यक्‍तींनी आमच्याजवळ तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त केली आहे. आमचा दोन लाखांनी पराभव होईल असे भाकित करणा-या पृथ्वीराज चव्हाण यांनाच आता मतदार दोन-दोन लाथा घालुन मतदार संघातुन हाकलुन लावणार असून, अतुल भोसले या उमद्या उमेदवारासह भाजपा-सेना व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करणार असल्याचा निर्धार बहुतांशी मतदारांनी बोलुन दाखवला आहे.
 
पृथ्वीराज चव्हाण यांना उद्याच्या 24 तारखेनंतर कोणताही उदयोग राहणार नसल्याने, त्यांनी आता अशी भाकिते सांगत फिरण्याऐवजी,  एखाद्या मोठया सावलीच्या झाडाखाली बसुन, कुडमुडया ज्योतिषाचा धंदाच आता सुरु करावा. त्यांना
तेवढेच काम उरणार आहे.

दरम्यान भाजपाचे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दुययम फलंदाज आहेत या वक्‍तव्यावर पलटवार करताना उदयनराजे म्हणाले भाजपामध्ये सलामीवीर, दुययम अशी फलंदाजांची मोठी फळी तरी आहे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कॉग्रेस पक्षात नाईट वॉचमन म्हणून सुध्दा फलंदाजी करण्यासाठी कोणी उरलेला नाही. तेज किंवा फिरकी गोलंदाज तर त्यांना अजुनही सापडलेला नाही नुसत्या फेकी गोलंदाजावर चालवून घेतले जात आहे. म्हणून त्यांच्या कार्यकर्तुत्वाची कीव तर वाटतेच पण किळसही वाटते. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांच्या दुटप्पी आणि स्वार्थांध कार्यशैलीमुळेच कित्येक जणांनी कॉग्रेस आघाडीच्या बुडत्या जहाजातुन केव्हांच उडी मारली आहे  असा टाेला देखील उदयनराजेंनी लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj Chavan will have to work as an astrologer in future says Udayanraje