खासगी डॉक्‍टरांचे "लॉक डाऊन' सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

सांगली  जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून सर्व जनरल प्रॅक्‍टिशनर्सनी "ओपीडी' सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तरीही जवळपास 80 टक्के डॉक्‍टरांनी दवाखाने "लॉक डाऊन' ठेवले आहेत. त्यामुळे रूग्णांत भितीचे वातावरण आहे.

सांगली : जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून सर्व जनरल प्रॅक्‍टिशनर्सनी "ओपीडी' सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तरीही जवळपास 80 टक्के डॉक्‍टरांनी दवाखाने "लॉक डाऊन' ठेवले आहेत. त्यामुळे रूग्णांत भितीचे वातावरण आहे. डॉक्‍टरच नसल्यामुळे रूग्ण थेट मेडिकल्समध्ये गर्दी करून गोळ्या-औषधे खरेदी करीत आहेत. आपत्तीच्या काळात अनेक डॉक्‍टर रूग्णसेवेपासून दूर असल्यामुळे संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सांगली जिल्ह्यात "कोरोना' चा शिरकाव झाल्यापासून शहरी व ग्रामीण भागातील डॉक्‍टरांनी स्वत:हून "लॉक डाऊन' चा निर्णय घेतला. वैद्यकीय सेवेवर परिणाम जाणवू लागला आहे. ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सिव्हीलमध्ये रूग्णांना उपचारासाठी जावे लागत आहे. वैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचे पाहून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जनरल मेडिकल्स प्रॅक्‍टिशनर्स फोरमची बैठक घेतली. बैठकीत फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर्स नसल्यामुळे त्याचा पुरवठा करावा, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी "ओपीडी' सुरू ठेवावी, असे आवाहन केले. 

डॉ. चौधरी यांच्या आवाहनानंतरही जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के जनरल प्रॅक्‍टिशनर्सनी दवाखाने बंदच ठेवले आहेत. डॉ. चौधरी यांनी दवाखाने कोणत्याही स्थितीत बंद ठेवता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश देत दवाखाने सुरू न ठेवल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. डॉ. चौधरी यांच्या आदेशानंतर काही प्रॅक्‍टिशनर्सनी ठराविक काळासाठी दवाखाने सुरू ठेवलेत. तर इतरांनी न जुमानता आजही दवाखाने "लॉक डाऊन' ठेवल्याचे चित्र पहायला मिळाले. सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारामुळे त्रस्त रूग्ण गेले दोन-तीन दिवस दवाखान्यात हेलपाटे मारत आहेत. परंतू "लॉक डाऊन' पाहून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. 

वैद्यकीय सेवेचे व्रत घेऊन या क्षेत्रात आलेल्या डॉक्‍टरांनी "लॉक डाऊन' केल्यामुळे रूग्णांना थेट मेडिकल्समध्ये जाऊन आजारावर गोळ्या औषधे घ्यावी लागत आहेत. रूग्णांची गरज पाहून मेडिकल्स चालक आता डॉक्‍टरांच्या भूमिकेत दिसत आहेत. दवाखाने बंद असल्यामुळे मेडिकल्समध्ये गर्दी दिसून येत आहे. तर ऐनवेळी डॉक्‍टरांनी दवाखाने बंद ठेवल्यामुळे रूग्ण आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. डॉक्‍टर अत्यावश्‍यक सेवेमध्ये असताना सुद्धा ते घाबरून पळाल्यामुळे आश्‍चर्यही व्यक्त होत आहे. 
कोट 

ही व्यवसायाशी प्रतारणा

रूग्णांच्या जीवावर दवाखाने चालवणाऱ्या डॉक्‍टरांनी आपत्तीवेळी गप्प बसणे म्हणजे व्यवसायाशी प्रतारणा आहे. भाजी, दूध आणि किराणा माल विक्रेते ग्राहकांची गरज पूर्ण करीत आहेत. मेडिकल्स देखील सुरू आहेत. डॉक्‍टरांनीच पळ काढणे आणि दवाखाने बंद ठेवणे गहे न पटण्यासारखे आहे. संबंधितांवर कारवाई करावी.

- अशोक गोसावी (सामाजिक कार्यकर्ते)

 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई 

कर्मचारी दवाखान्यात येत नाहीत या सबबीवर काही डॉक्‍टर दवाखाने बंद ठेवत आहेत. कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे द्यावीत. गरज पडल्यास हॉस्पीटलचे संचालक व जिल्हा शल्य चिकित्सकांच्या संयुक्त सहीचे ओळखपत्र देण्याचाही विचार सुरू आहे. पोलिस सोडत नाहीत, असे कारण पुढे करून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडत नसतील तर त्यांच्यावरही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.

-डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private doctors 'lock down' still goes on