मिरजेत खासगी सावकारी जोमात... कुणाचे पाठबळ?

 Private lenders in Miraj
Private lenders in Miraj
Updated on

मिरज : चंदन तस्करी, मटका, बनावट दारू आणि यासह अनेक अवैध व्यवसायांमुळे बदनाम झालेल्या मिरजमध्ये आता खासगी सावकारांच्या मुजोरीने नव्याने भर घातली आहे. हे अर्थातच पोलिस आणि राजकीय बळामुळेच शक्‍य झाले आहे.

धडधडीतपणे दिवसा ढवळ्या गोरगरिबांची पिळवणूक करणारी ही खासगी सावकारी म्हणजे मिरज शहराला लागलेला एक मोठा कलंक असूनही याची कसलीही खंत अथवा खेद येथील राजकीय नेतृत्वाला नाहीच किंबहुना शहरातील अनेक भुक्कड गोष्टींवर समाज माध्यमातून वारेमाप चर्चा करणाऱ्या सामाजिक संघटनानाही याचे भान नाही. वास्तविक सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी एखादी ठोस कारवाई केली तर कायमची बंद होऊ शकणारी ही खासगी सावकारी सध्या दिवसागणिक वाढते आहे. 

शहरातील अनेकांनी आत्महत्या केल्या, हजारो कुटुंबे देशोधडीस लागली आहेत, अनेकजण कायमचे परागंदा झाले आहेत. तरीही येथील पोलिस यंत्रणा जुजबी कारवायांवर समाधान मानते आणि सामाजिक संघटनाही काहीच वेगळे घडले नसल्याच्या आविर्भावात गप्प राहतात. इथेच सगळे चुकते आहे. येथील कोणी राजकारणी याबाबत एक चकार शब्द बोलत नाही कारण हे खासगी सावकारच या सर्वच राजकीय पक्षांचे भक्कम आधार स्तंभ आहेत. सावकारीबाबतीत वारंवार पोलिस यंत्रणा तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करते तरीही खासगी सावकारीमुळे पिचलेला एकही तक्रारदार पुढे येत नाही. याचा अर्थ नेमका काय समजायचा?

संजय मिरजकर यांच्या तक्रारीपूर्वीही संतोष कोळी या खासगी सावकार विरुद्ध एकाने तक्रार नोंदवली होती. सलग दोन वेळा तक्रारी दाखल होऊनही त्याची कशी आणि कितपत दखल घेतली जाते हे पोलिसांच्या जुजबी कारवायांमुळे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्यामुळेच खासगी सावकारी म्हणजे पोलिसांच्या अतिरिक्त उत्पन्नाचे एक मोठे साधनच आहे. गेल्या पंचवीस वर्षांत या खासगी सावकारीचे स्तोम शहरात केवळ पोलिस आणि राजकीय यंत्रणेमुळे वाढले आहे. गोरगरीब गरजूना मासिक व्याजाने पैसे देऊन त्यांची पिळवणूक करणारी एक मोठी यंत्रणा सध्या मिरज शहरात विविध टोळक्‍यांच्या स्वरूपात सक्रिय आहे. सहाजिकच याची माहिती पोलिस यंत्रणांना नसणे हे कदापि अशक्‍य आहे.

याच खासगी सावकारीस सर्वच राजकीय पक्षांचे पाठबळ आहे. यामध्ये साधनसूचितेचा आव आणणारा भाजपही मागे नाही. महापालिकेमध्ये तर खासगी सावकारीतील अनेक कारनाम्यांमुळे कुप्रसिद्ध असलेल्यांची एक मोठी टोळीच कारभारी म्हणून मिरवते आहे. यापैकी एका पक्षाने तर खासगी सावकारासच गटनेतेपदी विराजमान केले आहे. त्यामुळे राजकारणी आणि पोलिस यांच्या संगनमताने सध्या शहरात खासगी सावकारीतून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करण्याचा मोठा गोरखधंदा कर्करोगासारखा गल्लीबोळात पसरू लागला आहे.

शहरातील एकही गल्ली अथवा परिसर असा नाही की ज्या ठिकाणी एखाद्या खासगी सावकाराचे नाव ऐकायला मिळत नाही. राजकीय प्रतिष्ठा आणि पोलिसांचे पाठबळ मिळाल्यामुळे शहरातील गल्लीबोळात आता खासगी सावकारांची टोळकी निर्माण झाली आहेत. संजय मिरजकर या तंतुवाद्ये व्यावसायिकाचे उघडकीस आलेले प्रकरण हे केवळ अशाच सावकारीच्या हिमनगाचे एक टोक आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून हे प्रकरण गाजत असूनही आणि यामध्ये किमान आठ ते दहा सावकार सहभागी असूनही यापैकी केवळ दोघांना पोलिस अटक करू शकले आहेत. जे मुख्य खासगी सावकाराचे नोकर आहेत.

यासंदर्भात यापूर्वीही एका खासगी सावकारीविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. परंतु तक्रारी झाल्यानंतरही हा सावकार मोकाट राहून पुन्हा अनेकांची पिळवणूक करतो यातून पोलिसांच्या कारवायांचा अचूक अर्थ सहज निघतो. कर्जदारांची पिळवणूक करायची आणि तक्रार झाली की फरारी व्हायचे हे अलीकडे खासगी सावकारीतील एक सराईत सूत्र बनले आहे. या खासगी सावकारीस पायबंद घालण्यासाठी आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच या प्रकरणांचे सखोल तपास करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी मनात आणले तर खासगी सावकारीची पाळेमुळे केवळ चोवीस तासांत उखडून निघू शकतात. 

व्यापारी प्रवृत्तीचे पोलिस 
स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारे, राजकारणात जम बसलेले सगळे सावकार कठोर कारवाईच्याच नव्हे तर साध्या एखाद्या फटक्‍यातही सरळ होऊ शकतात. परंतु जोपर्यंत व्यापारी प्रवृत्तीचे अधिकारी मिरज शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे तोपर्यंत हे शक्‍य नाही. त्यामुळे आता शहरातील सामाजिक संघटनांनाच गल्ली गल्लीबोळातील या मुजोर खासगी सावकारांचा बंदोबस्त एकत्र येऊन करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com