जीम, फिटनेस सेंटरसमोरील अडचणी अद्याप कायम

घनशाम नवाथे
Thursday, 14 January 2021

कोरोनाच्या संकटात मोठा फटका बसलेल्या जीम आणि फिटनेस सेंटरसमोरील अडचणी अद्याप कायम आहेत. 50 ते 70 टक्के खेळाडूची उपस्थिती दिसते. तशातच शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याबाबत बंधने कायम आहेत.

सांगली : कोरोनाच्या संकटात मोठा फटका बसलेल्या जीम आणि फिटनेस सेंटरसमोरील अडचणी अद्याप कायम आहेत. 50 ते 70 टक्के खेळाडूची उपस्थिती दिसते. तशातच शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याबाबत बंधने कायम आहेत. परंपरेने स्पर्धा घेणारे संयोजक उदासिन आहेत. स्पर्धांबाबत अनिश्‍चितता असल्यामुळे बरेच खेळाडू सरावापासून दूरच आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून शरीरसौष्ठव स्पर्धांच्या हंगामावर यंदा सावट दिसते. 

सांगली जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के जीम या भाड्याच्या जागेत आहेत. काही जीम तळघरात असून गतवर्षी महापुराचा फटका त्यांना बसला होता. त्यानंतर कोरोनाच्या संकटात फिटनेस महत्वाचा असताना देखील सुरक्षेच्या कारणास्तव जीम बंद ठेवण्याचे आदेश होते. भाड्याच्या जागेत असलेल्या जीम चालकांना महिनाकाठी 20 ते 25 हजार रूपयांचे भाडे देणे कठीण बनले होते. तशातच देखभाल दुरूस्ती, वीज खर्च, प्रशिक्षकांचे मानधन आदीमुळे जीम चालक हवालदील बनले. जीम सुरू कराव्यात यासाठी आंदोलन करावे लागले. सर्वात शेवटी जीम चालकांना परवानगी दिली. 

जीम सुरू झाल्या असल्यातरी खेळाडूंची संख्या मर्यादीतच आहे. ग्रामीण भागात जीम सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. परंतू शहरी भागात हार्डकोअर जीममध्ये सध्या 50 ते 70 टक्के उपस्थिती आहे. तर मोठ्या जीम व फिटनेस सेंटरमध्ये 50 टक्के खेळाडूंची उपस्थिती दिसून येते. त्यामुळे जीम मालकांचे आर्थिक गणित अद्याप जुळून येत नाही. त्यांना खेळाडूंची प्रतिक्षा लागून राहिली आहे. खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी मोठ्या जीम मालकांनी सवलती जाहीर केल्या आहेत. 

एकीकडे जीम मालक खेळाडूंच्या प्रतिक्षेत असले तरी दुसरीकडे बरेच खेळाडू सरावापासून दूर आहेत. शरीरसौष्ठवसाठी महिनाकाठी फार मोठा खर्च खुराकावर करावा लागतो. एवढा सगळा खर्च करून स्पर्धा होणार नसतील तर व्यायाम कशासाठी करायचा? असा विचार करून बरेचजण थांबले आहेत. जिल्ह्यात परंपरेने स्पर्धा घेणारे अनेक संयोजक आहेत. परंतू बंधनामुळे ते उदासिन आहेत. डिसेंबरमध्ये स्पर्धांचा हंगाम सुरू होतो. तो एप्रिल-मे पर्यंत चालतो. परंतू यंदा हंगामावर सावट निर्माण झाले आहे. 

प्रेक्षक संख्येवर बंधन 
शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यास काहीजण इच्छुक आहे. परंतू प्रेक्षक संख्येवर बंधने आहेत. त्यामुळे स्पर्धा घेऊन काय उपयोग? असा ते सवाल करीत आहेत. त्यामुळे त्यातून मार्ग काढण्याची मागणी शरीरसौष्ठव संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problems in front of the gym, fitness center still persist