"सकाळ'च्या वृत्तांमुळे समस्यांची तड 

दाैलत झावरे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

अकोले तालुक्‍यातील सुगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथे एकही अधिकारी व कर्मचारी नाही. या केंद्रात अद्याप वीजजोडणी झालेली नाही, असा मुद्दा जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला. 

नगर ः जिल्हा परिषदेतील अनेक प्रश्‍नांवर "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्या वृत्तावर आज सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होऊन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. 

जिल्ह्यातील 45 शाळांना मैदाने नाहीत. "महानेट'च्या कामामुळे नगरमधील रस्ते खोदले, "एकाच अभियंत्याच्या खांद्यावर जिल्ह्यातील दिवाबत्तीचा भार' या मथळ्याखालील वृत्तावर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी चर्चा केली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. 

 

हेही वाचा ः "बीओटी'चा प्रस्ताव नामंजूर

 

सर्वसाधारण सभेत "खेळ' 
"जिल्ह्यातील 45 शाळांना क्रीडांगण नाही' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तावर शिक्षण समितीच्या सभेत वारंवार चर्चा झाली. तशीच चर्चा आज सर्वसाधारण सभेतही झाली. क्रीडांगण नसलेल्या शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, असा मुद्दा राजेश परजणे यांनी मांडला. तशा सूचनाही अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी संबंधितांना दिल्या. 

 

अवश्य वाचा ः दराडे यांनी लढविली एकाकी खिंड 

 

"महानेट'ने खोदलेले रस्ते होणार दुरुस्त 
"महानेट'च्या कामासाठी नगर तालुक्‍यातील रस्ते खोदण्यात आले आहेत. या संदर्भात "सकाळ'ने पाठपुरावा केला. हा मुद्दा आज संदेश कार्ले व नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी उपस्थित केला. रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्याची सूचना सभागृहात करण्यात आली. त्यावर, संबंधित कामाची पाहणी करून तसा अहवाल करावा, संबंधित यंत्रणेकडून रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागीय कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. 

एकाच अधिकाऱ्यामुळे वीजजोडणी होईना 
अकोले तालुक्‍यातील सुगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथे एकही अधिकारी व कर्मचारी नाही. या केंद्रात अद्याप वीजजोडणी झालेली नाही, असा मुद्दा जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला. "एकाच अभियंत्याच्या खांद्यावर जिल्ह्यातील दिवाबत्तीचा भार' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याच वृत्तावर वाकचौरे म्हणाले, की जिल्हा परिषदेत इलेक्‍ट्रिकचे काम करण्यासाठी एकच अधिकारी असल्यामुळे सुगावसह अनेक ठिकाणची विकासकामे ठप्प आहेत. 

महसूलमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह सर्व आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला. हा ठराव रामहरी कातोरे यांनी मांडला. त्यास महेंद्र गोडगे पाटील यांनी अनुमोदन दिले. 

"मी पुन्हा येईन'चा "संदेश' 
नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर वारंवार प्रश्‍न विचारत होते. त्यामुळे "आम्हालाही बोलू द्या सभापती,' असे काही जण म्हणाले. त्यावर इतर सदस्य म्हणाले, की त्यांना बोलू द्या; त्यांची शेवटची सभा आहे. संदेश कार्ले म्हणाले, ""भोर जरी पुन्हा येणार नसले, तरी मी पुन्हा येईन...!' त्यावर सभागृहात हशा पिकला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems solved