कणेगाव, भरतवाडी गावांच्या पूर पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली

The process of flood rehabilitation of Kanegaon, Bharatwadi villages was delayed
The process of flood rehabilitation of Kanegaon, Bharatwadi villages was delayed

इस्लामपूर : वाळवा तालुक्‍यातील कणेगाव व भरतवाडी या गावांच्या पूर पुनर्वसनाची प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडली आहे. राजकीय दुर्लक्ष, की प्रशासकीय अनास्था अशी शंका ग्रामस्थांत आहे. ही दिरंगाई कधी थांबेल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

वारणा काठावरील कणेगाव व भरतवाडीतील ग्रामस्थांना सन 1953 पासून सन 2019 पर्यंत आलेल्या महापुरांमुळे खूप झळ सोसावी लागली आहे. यापूर्वी कान्होबा हौसिंग सोसायटीच्या माध्यमातून 100 व मागासवर्गीय सोसायटीच्या माध्यमातून 33 लोकांना सन 1989 पुर्वी भूखंड देण्यात आलेत. त्यापैकी काही प्लॉट शासनाच्या पुर्वपरवानगी शिवाय काहींनी विक्री करून पुन्हा नव्याने प्लॉट मिळवण्यासाठी प्रयत्न कसुरू केले आहेत. उर्वरित ग्रामस्थांना प्लॉट देण्यासाठी सन 1989 मध्ये शासनाने 9 हेक्‍टर 66 आर जमीन संपादित केली. वेळोवेळी प्रयत्न होऊनही अद्याप गरजूंना प्लॉट वाटप करण्यात आलेले नाही. 

या मुद्द्यावर महेश पाटील यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यामार्फत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. परंतु आजही प्रश्न "जैसे थे' आहे. सन 2017 मध्ये सरपंच ऍड. विश्वासराव पाटील यांनी ग्रामस्थांसह प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. आमदार मानसिंगराव नाईक व दिवंगत विलासराव शिंदे यांच्या मध्यस्थीने तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सहा महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासनही दिले. परंतू संपादित जागेची मोजणी होण्यापलीकडे हा प्रश्न पुढे सरकला नाही. 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी जून 2020 मध्ये प्रांताधिकारी नागेश पाटील यांना सुचना दिल्याचे सांगण्यात येते. जुलै 2020 पासून प्लॉट मागणी अर्ज मागणी, छाननी, आक्षेप, चौकशी करणे याप्रक्रीया सुरू होत्या. अंतीम यादी व प्लॉटचे रेखांकन अद्याप झालेले नाही. त्यामुळे गावात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. जुलै 2020 मध्ये प्रसिद्ध जाहिरनाम्यात अंतीम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे. 

प्रशासकीय अधिकारी बदलला की, तसेच प्रकरण अंतीम टप्प्यावर आले की अधिकाऱ्यांची बदली होते. ग्रामस्थांना मागणीसाठी पुन्हा श्रीगणेशा करावा लागतो. कणेगावच्या पुनर्वसनाबाबत विद्यमान प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी सखोल अभ्यास करून प्रकरण अंतीम टप्प्यावर नेले आहे. त्यांच्या कार्यकाळातच कणेगावचे पुनर्वसन निकाली निघावे, अशीही ग्रामस्थांची अपेक्षा आहे. 

तरूणांच्या लग्नाचा प्रश्न! 
घरे अत्यंत लहान असल्याने मुलीचा विवाह ठरवतानाही पालक विचार करतात. त्यामुळे तरुणांच्या लग्नाचा गंभीर झाला आहे. विवाहयोग्य तरूणांचे लग्न होणे अवघड बनल्याची भावना तरुणांत आहे. ज्यांना पूर्वी प्लॉट मिळाले नाहीत, त्यांना शासनाने प्राधान्याने प्लॉट द्यावेत, अशी अपेक्षा आहे. 

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पुनर्वसनाची प्रक्रिया लवकर संपेल. या महिन्याच्या अखेरपर्यंत अंतीम यादी प्रसिद्ध होईल. 
ऍड. विश्वासराव पाटील, सरपंच. 

अनेक किचकट बाबींवर काम करून कणेगाव व भरतवाडी पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करत आणली आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल." 
-नागेश पाटील, प्रांताधिकारी. 

संपादन ः प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com