तासगावात मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणूक 

रविंद्र माने
Monday, 24 August 2020

गेल्या 241 वर्षांची रथोत्सवाची परंपरा असलेला सिद्धिविनायकाचा रथोत्सव कोरोनामुळे रद्द झाला. मात्र त्याच भक्तीभावाने मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत उघड्या जीपमधून श्रींची मिरवणूक काढण्यात आली.

तासगाव : गेल्या 241 वर्षांची रथोत्सवाची परंपरा असलेला सिद्धिविनायकाचा रथोत्सव कोरोनामुळे रद्द झाला. मात्र त्याच भक्तीभावाने मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत उघड्या जीपमधून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक छोटी असली तरी तोच उत्साह आणि तेच भक्तीपूर्ण वातावरण होते. गणेशोत्सव सुरू असूनही दिवसभर शहरात शुकशुकाट असल्याचे चित्र होते. 

येथील पटवर्धन संस्थानच्या श्री सिद्धिविनायकाचा रथोत्सव महाराष्ट्रातील गणेश भक्तांसाठी श्रद्धेचा उत्सव असतो. ऋषी पंचमीला साजऱ्या होणाऱ्या रथोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित असतात. वडिलांना भेटण्यासाठी "श्री' काशीविश्वेश्वर मंदिरात जातात, अशी आख्यायिका आहे. "श्रीं'ची रथातून मिरवणूक काढली जाते. तीन मजली लाकडी रथ हजारो भाविक हाताने ओढतात. मात्र आज पारंपारिक रथोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने भाविकांत नाराजी होती . 

रविवारी दुपारी एक वाजता मंदिर परिसरातून फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वी धार्मिक विधी झाले. जीपमध्ये राजेंद्र पटवर्धन यांच्यासह पाच मानकरी सहभागी झाले होते. श्री काशीविश्वेश्वर मंदिरात भेट झाल्यानंतर उत्सवमूर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात आली. दरवर्षी पाच ते सहा तास चालणारा रथोत्सव तासाभरातच झाला. "मोरया मोरया'चा जयघोष, प्रसादाची उधळणही सुरु होती. मिरवणुकीपूर्वी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी श्रींचे दर्शन घेतले. तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह अधिकारी, मान्यवर उपस्थित होते. 

प्रचंड गर्दीचा मार्ग यंदा सुनसान 
दरवर्षी सकाळपासूनच रथोत्सवासाठी लाखोंची उपस्थिती असल्याने शहरातील सर्व रस्ते व्यापलेले असतात. यंदा मात्र कोरोनामुळे रथोत्सव मार्गावर येण्यास बंदी होती. तरीही भाविकांनी घरातून श्रींचे दर्शन घेतले. काशीपुरा भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षीच्या रथयात्रेचा मार्ग पोलिस प्रशासनाने बंद ठेवला होता. मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवल्याने दरवर्षी गर्दीने फुललेल्या मार्गावर शुकशुकाट होता. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Procession in the presence of few dignitaries in Tasgaon