पीठ में का दर्द, चोल्या तो मोकला होता है! 

रजनीश जोशी
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

अपनी भाषा अच्ची बोलते उन्हो... 
लक्ष्मी मार्केटमध्ये तत्कालीन उपमहापौर इस्माईल बागवान फळं विकत. त्यांच्याकडून प्रा. देशपांडे केळी विकत घेताना श्री. बागवान शेजारच्या फळविक्रेत्याला म्हणाले,"अपनी भाषा अच्ची बोलते उन्हो...' तर पूर्वभागातील एक विडीकामगार महिला एका बसमध्ये बसली. कंडक्‍टरकडे तिने "कोंतम चौका'चे तिकीट मागितले. ही बस कोंतम चौकात जात नाही, असे कंडक्‍टरने सांगितल्यावर ती म्हणाली,"जात नाही म्हणलं तर कसं आस्तंय?' अशी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी सोलापुरी बोलीची वैशिष्ट्ये सांगितली. 

सोलापूर ः कोकणी माणूस जसा नाकातून बोलतो, तसाच सोलापुरी माणूसही नाकातून बोलतो, मात्र त्याचा आवाज मोठा असतो. सोलापुरी बोलीवर कन्नड, तेलुगु, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांचा प्रभाव आहे, असे मत प्रा. दीपक देशपांडे यांनी "सकाळ'मध्ये बोलताना व्यक्त केले. 

सोलापुरी हिंदी, कन्नड आणि तेलुगुवर मराठीचा प्रभाव आहे, हे सांगताना त्यांनी "पीठ में का दर्द, चोल्या तो मोकला होता है' अशा स्वरूपाची वाक्‍ये सांगितली. 
अगदी आदिलशाहीपासून पुढे पेशव्यांचा काळ, त्यानंतर इंग्रजांचा अंमल आणि पुढे तेलुगु भाषिक, मारवाडी, गुजराती अशा मंडळींचे सोलापुरात आगमन झाले. त्यामुळे इथल्या मराठी भाषेवर परिणाम होऊन नवी सोलापुरी बोली तयार झाली, असे नमूद करून ते म्हणाले,"" बाळीवेस-मसरे गल्लीतील मराठी आणि पूर्वभागात बोलले जाणारे मराठी वेगवेगळे असते. "गेल्तो',"आल्तो',"आस्तो' असे शब्द सर्रास वापरले जातात. "समज' हा शब्दही अनेकदा वापरण्याची सवय सोलापूरकरांना आहे. "मी तिकडं गेल्तो समज',"त्येनं तिकडून आला समज',"त्येनं मला सांगितला समज' अशी वाक्‍यं वापरली जातात, त्यात कुणाला वावगं वाटत नाही. 

सोलापुरी हिंदी हेदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. "जा रे फल्ल्या लेकू आ',"उसको काम की गरज नै'," तू गयास्ता तो, मैं आयास्ता तो' असा मराठीचा परिणाम हिंदीवर आहे. बोलीभाषेचे हे वातावरण महाराष्ट्रात अन्यत्र कुठेच दिसणार नाही. तेलुगु तरुणांचे मराठी उच्चार न कळाल्याने विनोद होतो, हे स्पष्ट करताना त्यांनी चित्रकला महाविद्यालयात शिकवताना आलेला अनुभव सांगितला. एका विद्यार्थ्याला फळ्यावर लिहिण्यासाठी ऑफिसातून खडू आण, असे त्यांनी सांगितले. तो विद्यार्थी ऑफिसमध्ये गेला आणि म्हणाला,"पळ्यावर लिहाला कडू पायजे.' त्याचे हे वाक्‍य तिथे कुणाला समजलेच नाही. "ख'चा उच्चार "क'सारखा करणे, "फ'चा उच्चार "प'सारखा करणे हे तेलुगुभाषिकांकडून सहजच होते. 

सोलापूरची अस्सल भाषा कन्नड आहे. पण कन्नड भाषिकांचे मराठी आणि त्यांचे कन्नडही वर्षानुवर्षांच्या संगतीने संक्रमित झाले आहे. शुक्रवार पेठ, बाळीवेस भागातील कन्नड वेगळे आहे. सोलापूरचे लोक कन्नड तोंडाने मराठी बोलतात, असे विशद करून प्रा. देशपांडे म्हणाले, हेल काढून बोलणं हे इथले वैशिष्ट्य आहे. अक्कलकोट आणि सीमाभागातही असेच हेल काढून बोलले जाते. आपल्याकडील कन्नडमध्ये "डोकं दुकास्ली कत्तिदं' अशी वाक्‍य सर्रास असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof. dipak deshpande analises of mix marathi languge