video कोण म्हणाले, कर्डिलेसाहेब आले फॉर्च्युनरमध्ये बसून.... शब्द देते हसून 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

नगर-राहुरी मतदारसंघातील माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानीही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांच्या सौभाग्यवती अलकाताई कर्डिले यांनी घेतलेला उखाणा चांगलाच चर्चेत आहे. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. 

नगर ः संक्रांतीला पंधरा दिवस उलटून गेले असले तरी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम अजून सुरूच आहेत. अलिकडे राजकीय हळदी-कुंकाचे कार्यक्रमही रंगतात. काही सामाजिक संघटनांनी अनोखे हळदी़ कुंकवाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. विधवा महिलांना वाण वाटून परंपरा पाळण्यासोबतच रूढीभंजनाचा कार्यक्रम केला.

नगर-राहुरी मतदारसंघातील माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानीही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांच्या सौभाग्यवती अलकाताई कर्डिले यांनी घेतलेला उखाणा चांगलाच चर्चेत आहे. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगरचे रहिवासी. एका सामान्य कुटुंबातून त्यांनी आमदारपदापर्यंत मजल मारली होती. सलग पाच वेळा या मतदारसंघातून निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. ते मंत्रीही राहिले आहेत. दूधवाल्यांचा नेता म्हणून त्यांची अोळख होती. मंत्रीपदापर्यंत गेल्यानंतरही त्यांनी सामान्य जनतेसोबतची नाळ तुटू दिली नाही. मतदारसंघातील अंत्यविधी, दहावे, तेरावे किंवा जागरण गोंधळ असे कोणतेही कार्यक्रम असले तरी कर्डिले हे कार्यकर्ते आणि मतदारांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्यासमोर कोणाच्याही शिफारशीशिवाय पोहचू शकतो. 

 

नेहरू शर्ट अन टोपी
उच्च पदापर्यंत जाऊनही त्यांनी आपल्या राहण्या-वागण्यातील सामान्यपणा सोडला नाही. नेहरू शर्ट, पायजमा आणि गांधी टोपी असा पेहराव त्याचेच प्रतीक. आपली अगदी पहिली भेट असली तरी ते अगदी फार पूर्वीपासूनची ओळख असल्यासारखे वागतात. त्यामुळे ते समोरच्या माणसाला आपले वाटतात. नगरचे आमदार संग्राम जगताप हे त्यांचे जावई आहेत. आमदार अरूण जगताप यांचे ते व्याही आहेत. दुसरे जावई संदीप कोतकर हे नगरचे महापौर राहिले आहेत. मुलगी सुवर्णाही उपमहापौर होत्या. 

बडेजाव नाही
एकंदरीत कोणतेही पद असो नाही तर नसो कर्डिले यांच्या वागणुकीत कधीच फरक पडलेला नाही. तशीच साधी राहणी त्यांच्या कुटुंबात आहे. त्यांच्या सौभाग्यवती अलकाताई कर्डिले यांचाही लोकसंपर्क आहे. मात्र, त्या राजकीय व्यासपीठावर कधीच नसतात. त्यांच्या वागण्यातही कधीच बडेजाव नसतो. त्या आजही संक्रांतीला सार्वजनिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. यंदाही नगरसह, पाथर्डी, राहुरीत तालुक्यातील कार्यकर्ते, नेत्यांच्या तसेच सर्वसामान्य महिला-भगिनी उपस्थित होत्या.

असा घेतला उखाणा 
निवेदक उद्धव काळापहाड यांच्या जुन्या पारंपारिक गीतांच्या कार्यक्रमाने या हळदी-कुंकू समारंभात रंगत आणली. संक्रांतीचे वाण देताना उखाणा घेण्याचा रिवाज आहे. यावेळी अलकाताईंनी घेतलेला उखाणा सर्वत्र चर्चेचा ठरला. निवेदक उद्धव ऊर्फ केपी यांनी त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला. त्यावर त्यांनी आढेवेढे न घेता दोन उखाणे घेतले. त्यास उपस्थित सुवासिनींनी तेवढ्यात उत्स्फूर्तपणे दाद दिली. त्यांना सर्वाधिक आवडला तो फॉर्च्युनरचा उखाणा. त्याचीच मतदारसंघात चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Program at the home of former MLA Shivajirao kardile