अतिथीगृह पाडण्याचा प्रस्ताव महासभेत...शुक्रवारी महापालिकेची सभा : महापालिकेत आणखी एका बीओटीच्या हालचाली 

बलराज पवार
Tuesday, 15 September 2020

सांगली-  महापालिकेत आणखी एका बीओटीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरवलेल्या अतिथीगृहाची इमारत पाडण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. 18) होणाऱ्या ऑनलाईन महासभेसमोर आणला आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात या इमारतीच्या मागीलबाजूस असलेली प्रसुतीगृहाची इमारतही पाडून या संपूर्ण जागेत व्यापारी संकुल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. हे संकुल बीओटी तत्वावर करण्याचा प्रयत्न आहे. 

सांगली शहर पोलिस ठाण्याशेजारी महापालिकेची अतिथीगृहाची इमारत आहे. ही इमारत जुनी असून धोकादायक बनली आहे. स्लॅबचे अनेक ठिकाणी तुकडे होऊन पडले आहेत. त्यामुळे ही इमारत पाडून तेथे व्यापारी संकुल बांधण्याची चर्चा अनेकवेळा झाली. स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्येही ही इमारत धोकादायक झाल्याने पाडण्याची शिफारस केली आहे. मात्र ही जागा सहा हजार चौरस फूट आहे. व्यापारी संकुलासाठी एवढी जागा अपुरी असल्याने या इमारतीच्या मागे असलेली प्रसुतीगृहाची जागा घेण्याची धडपड सुरु आहे. तसे झाल्यास एकूण सुमारे 20 हजार चौरस फूट जागा होते. त्यामुळे प्रसुतीगृहाची इमारतही पाडून दोन्ही जागा मिळून व्यापारी संकुल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र प्रसुतीगृहाचे काय होणार याबद्दल अजून चर्चा नाही. 

महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता असताना हा प्रयत्न सुरु होता. त्याला विरोध झाल्याने ते थांबले. आता भाजपच्या सत्तेत पुन्हा हा विषय चर्चेत आला. वास्तुविशारदामार्फत संकुलाचा आराखडाही तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारच्या महासभेसमोर अतिथीगृहाची इमारत पाडण्याचा विषय आणला आहे. त्यानंतर प्रसुतीगृहाचा नंबर लागणार आहे. त्यामुळे महासभेत धोकादायक अतिथीगृह इमारत पाडण्याचा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. 

पारदर्शी कारभार करावा 
उत्पन्न वाढीच्या नावाखाली यापुर्वीही बीओटीचे प्रयोग झाले. मात्र मोक्‍याच्या जागांचा बाजार करुन ठराविक जणांचे उखळ पांढरे होण्यापलिकडे महापालिकेच्या उत्पन्नात काही भर पडत नाही. उलट कोट्यवधींचा फटका बसला आहे. सत्ताधारी भाजपच्या पारदर्शी कारभाराच्या आश्‍वासनात हा बाजार होऊ नये अशी अपेक्षा आहे. 
.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal to demolish guest house in the general body meeting. Friday Municipal Corporation meeting