दुसऱ्या सिनियर डिव्हीजनसाठी प्रस्ताव द्या, निर्णय घेऊ

गजानन बाबर
Friday, 11 December 2020

विटा : येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर (उपजिल्हा) होण्यास थोडासा विलंब झाला. वकील संघटनेचे पदाधिकारी व विधिज्ञ न्यायीक खटले निकालात काढतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

विटा : येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर (उपजिल्हा) होण्यास थोडासा विलंब झाला. वकील संघटनेचे पदाधिकारी व विधिज्ञ न्यायीक खटले निकालात काढतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. सिनियर डिव्हीजन न्यायालय सुरू केले आहे. खानापूर, कडेगाव, आटपाडी व पलूस तालुक्‍यांचे कामकाज येथे चालणार आहे. खटल्यांची कामे जास्त आहेत. त्यामुळे अजून एक सिनियर डिव्हीजन न्यायालय सुरू करावे, अशी मागणी आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठवून द्या. मंजुरीच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेऊ. असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सांगितले. 

विटा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर (उपजिल्हा ) न्यायालयाचे ऑनलाईन उद्‌घाटन न्यायमूर्ती सांबरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे म्हणाले,""1985 पासून विटा येथे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची मागणी होती. जिल्हा हेडक्वार्टरवरून हे न्यायालय विटा येथे आणले आहे. लोकांना न्याय मिळेल यादृष्टीने काम करावे.'' 

न्यायमूर्ती संदीप शिंदे म्हणाले,""या दिवाणी न्यायालयात वर्ग केलेल्या 2 हजार 95 प्रकरणांपैकी 2 हजार 44 प्रकरणे वैवाहिक संदर्भातील आहेत. या लोकांना न्यायासाठी अनेक किलोमीटर जावे लागत होते. त्यांना फायदा होईल.'' 

जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील म्हणाले,""पलूस, कडेगाव, आटपाडी व खानापूर तालुक्‍यांतील लोकांसाठी विटा येथे मध्यवर्ती न्यायालय सुरू होत असल्याने त्यांची सोय होणार आहे. लोकांचा वेळ, प्रवास व आर्थिक बचत होणार आहे.'' 

स्वागत व प्रास्ताविक ऍड. शुभांगी पाटील यांनी केले. यावेळी उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक शिवकुमार दिगे, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, ऍड. वैभव पाटील, ऍड. बाबासाहेब मुळीक, ऍड. सुभाष कुंभार यांच्यासह वकील, शासकीय अधिकारी उपस्थित होते. न्यायाधीश श्रीमती दीपाली चोथे यांनी आभार मानले.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for the second senior division, let's decide