काळ्या दिनी गावागावांत होणार निषेध

मिलिंद देसाई
Saturday, 31 October 2020

रविवारी मराठी भाषिकांचा अन्याया विरोधात हुंकार पहावयास मिळणार आहे.

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासुन मराठी भाषिकांवर झालेल्या अन्याया विरोधात एक नोव्हेंबर काळ्या दिनी बेळगाव तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये निषेध व्यक्‍त केला जाणार आहे. याबाबत शनिवारी कार्यकर्त्यांनी गावागावांत फिरुन याबाबत जगजागृती केली आहे. त्यामुळे रविवारी मराठी भाषिकांचा अन्याया विरोधात हुंकार पहावयास मिळणार आहे.

दरवर्षी काळ्या दिनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने शहरात निषेध फेरीचे आयोजन केले जाते. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याचे कारण पुढे करीत निषेध फेरीला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन निषेध व्यक्‍त करता येणार नाही. त्यामुळे तालुका समितीने गावागावांत नियम पाळुन आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दखल घेत निषेध करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये निषेध व्यक्‍त करण्याचा निर्णय घेतला असुन काळे मास्क, काळे झेंडे व दंडावर काळ्या फिती बांधुन निषेध नोंदवला जाणार आहे. 

हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत गैरसमज पसरवू नये; जलसंपदा मंत्री जयंत पाटील -

1956 मध्ये भाषांवार प्रांत रचना करतेवेळी बेळगावसह सीमाभागातील 865 गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली आहेत. याच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवत असतात. मात्र दरवेळी कर्नाटक सरकारकडुन मराठी भाषिकांची मुस्कटदाबी केली जाते. तरीही विरोध डावलुन काळा दिन यशस्वी केला जातो. यावेळीही त्याच प्रमाणे अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. 

कार्यकर्त्यांनी शांततेत आणि संयमाने निषेध नोंदवावा असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. तसेच निषेध कार्यक्रमामुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याकडेही लक्ष देण्यात यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

"यावेळी कोरोनाचे संकट असल्यामुळे फेरी काढण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेने आपल्या गावात केंद्र सरकारच्या निषेध करावा. यावेळी काळे झेंडे, काळे मास्क व दंडावर काळ्या फिती बांधुन कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्‍त करावी."

- मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समिती

हेही वाचा -  भूतनाथ डोंगरावर पिडा टाळण्यासाठी ग्रामस्थांनी दिला चांगलाच चोप -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest for black day of 1 november in belgaum language problem