
सरकारी रुग्णालयात एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी वैद्यकीय चाचणी आणि उपचार विनाशुल्क देण्याचे आदेश आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने बजाविले आहेत.
एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी उपचार विनाशुल्क द्या, अन्यथा कारवाई
बेळगाव - सरकारी रुग्णालयात (Government Hospital) एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी (HIV / Aids) वैद्यकीय चाचणी (Medical Test) आणि उपचार (Treatment) विनाशुल्क देण्याचे आदेश आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने बजाविले आहेत. आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या आयुक्तांनी या संदर्भात २८ मार्च रोजी पत्रक जारी केले आहे. तसेच वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली पिळवणूक किंवा पैसे घेतल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
एचआयव्ही-एड्सबाधितांच्या चाचण्या, वैद्यकीय उपचार विनाशुल्क देण्याबाबतचे आदेश यापूर्वी बजाविले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष सुरु आहे. काही शासकीय रुग्णालयात एचआयव्ही आणि एड्सबाधितांकडून चाचण्या आणि उपचारासाठी शुल्क आकारणी केली जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे एचआयव्हीबाधितांना विनाशुल्क उपचार आणि चाचण्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. परिणामी, आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. उपचाराच्या नावाखाली शुल्क आकारणी करणाऱ्या डॉक्टर व सहाय्यकांवर कारवाईचे आदेश बजाविले आहेत.
आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याचे मंत्री डी. सुधाकर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी याबाबतचे एक पत्रक दोन दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग आणि सरकारी रुग्णालय व एआरटी केंद्रांना पाठविले आहे. यात चाचण्या किंवा उपचाराच्या नावाखाली शुल्क आकारणी केल्याचे आढळून आल्यास कारवाईला सामोर जावे लागेल, असा इशारा दिला आहे. तसेच आरोग्य समस्या आणि रुग्णांची पिळवणूक थांबविण्यासह चाचण्या, एक्सरे, अल्ट्रासाऊंड, एआरटीसीतील वैद्यकीय उपचारासह पूर्वचाचण्या मोफत उलब्ध करून देण्याचे आदेश आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तांनी बजाविले आहेत.
Web Title: Provide Free Treatment For Hiv Aids Patients Otherwise Take Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..