पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने रोख अनुदान द्या

बलराज पवार
Saturday, 17 October 2020

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झालेले आहे. शासनाने तातडीने त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना रोख अनुदान देण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सांगली : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झालेले आहे. शासनाने तातडीने त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना रोख अनुदान देण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन आमदार गाडगीळ यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले. 

आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसाने सर्व पिके उध्वस्त केली आहेत. आपला पालन-पोषण कर्ता बळीराजा कोलमडून पडला आहे. सोयाबीन, भात, द्राक्षसहित फळबागा, भाजीपाल्याचे आणि ऊस पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना रोख अनुदान द्यावे. पुराचे पाणी शिरून ज्या घरांचे व मालमत्तेचे नुकसान झालेले आहे अशा घरांचे पंचनामे करून त्यांना रोख अनुदान द्यावे. 

गेल्या वर्षीच्या महापुरावेळी तत्कालीन महायुती शासनाने पूरग्रस्त शेतीचे, घरांचे तसेच व्यापाऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना रोख अनुदान जागेवर दिले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातही 50 हजार रुपयापासून एक लाखापर्यंतची मदत जमा केली होती. याप्रमाणेच प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करून व्यापारी व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांप्रमाणे हेक्‍टरी सुमारे 50 हजार ते एक लाख रुपये नुकसान भरपाई त्यांच्या बॅंक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, गणपती साळुंखे, किरण भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide immediate cash subsidy to farmers through panchnama