सांगली सिव्हिल हॉस्पिटलसाठी राज्य अर्थसंकल्पात 93 कोटींची तरतूद

Provision of Rs. 93 crore in the state budget for Sangli Civil Hospital
Provision of Rs. 93 crore in the state budget for Sangli Civil Hospital

सांगली : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सांगलीसाठी दोन भरीव आर्थिक तरतुदी दिसतात. सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलसाठी 93 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रदीर्घकाळापासून यासाठी घोषणा होत आहेत. आता त्या प्रत्यक्षात येतील अशी अपेक्षा आहे. यानिमित्ताने सिव्हिलच्या अन्य योजनांना गती मिळेल अशी आशा आहे. 

सांगली सिव्हिल हॉस्पिटल्सच्या जुन्या इमारतीचा सुमारे शंभर खाटांचा भाग स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये धोकादायक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ते खाट वजा जाता सिव्हिलमध्ये 290 खाटा शिल्लक राहतील. "मिरज सिव्हिल'ची क्षमता 310 खाटांची आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील आधीच्या दीडशे आणि नंतरच्या पन्नास विद्यार्थी जागांचा विचार करता किमान नऊशे खाटांची गरज आहे. त्यामुळे दोन्ही हॉस्पिटल्सच्या विकासाचा सतत आग्रह धरण्यात आला. नव्या प्रस्तावानुसार सांगलीत 500 बेडचे नवे हॉस्पिटल होणार आहे. त्यासाठी बांधकाम, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळासाठीचा 297 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

याशिवाय केंद्र सरकारच्या निधीतून इथे माता-शिशू हॉस्पिटल्सचा 45 कोटींचा 100 खाटांचा प्रस्ताव मंजूर आहे. त्याचीही निविदा प्रक्रिया लवकरच निघणार आहे. 2016-17 मध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे 200 खाटांचा प्रस्तावही सांगलीत मंजूर आहे. हे तीनही प्रस्ताव मार्गी लागले, तर केवळ सांगलीत 1290 खाटा उपलब्ध होतील. मिरज सिव्हिलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची हॉस्पिटल्स सुपर स्पेशालिटीमध्ये रुपांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या योजनांचा भाग म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी यापुढे पाठपुराव्याची गरज आहे. 
 

2017 पासून माझा पाठपुरावा

2017 पासून माझा पाठपुरावा सुरु होता. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांना महिन्यापुर्वी भेटून मी यासाठी भेटलो होतो. त्यांनीही शब्द दिला होता. गेल्या आठवड्यात प्रधान सचिव सिताराम कुंटे यांनीही उच्चाधिकार समितीत या विषयाला मंजुरी दिली होती. आज बजेटमध्येही अर्थमंत्र्यांनी 93 कोटींच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी दिली. 
- सुधीर गाडगीळ, आमदार 

सिव्हिलमधील खाटांची संख्या 1290 होईल
सिव्हिलशी संबंधित सर्व प्रकल्प मार्गी लागल्यानंतर केवळ सांगली सिव्हिलमधील खाटांची संख्या 1290 इतकी होईल. सध्या ती 390 इतकी आहे. सांगली आणि परिसराची गरज पाहता हे प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे त्याला गती मिळेल. 
- डॉ. नंदकुमार गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, पद्मभुषण वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय, सांगली 

दर्गा विकासासाठी निधी 
जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्र विकासाला गती देण्यासाठी म्हणून मिरजेतील मिरासाहेब दर्ग्याच्या परिसर विकासाचा 156 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सध्याच्या दर्ग्याच्या मुळ ऐतिहासिक इमारती व परिसराचा जिर्णोद्धार, या परिसरातील भक्तनिवासाची तीन संकुले, परिसरातील विक्रेत्यांसाठी शॉपिंग मॉल, दर्गा कब्रस्थान परिसरातील ऐतिहासिक विहिरीचा जिर्णोद्धार, अंतर्गत रस्त्यांचा विकास, मिरज वैद्यकीय महाविद्यालयामागील इदगाह मैदान परिसराचा विकास, मिरज दर्गा परिसराला जोडणारे रस्त्यांची कामे अशा कामांचा समावेश आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी भाषणात मिरज दर्ग्यासाठी आर्थिक तरतूद करू असे जाहीर केले आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com