आई - वडील सांगत नाहीत तोपर्यंत राजकारणाविषयी निर्णय नाही

आई - वडील सांगत नाहीत तोपर्यंत राजकारणाविषयी निर्णय नाही

‘‘वडील खासदार आहेत म्हणून मी त्यांचा राजकीय वारसदार व्हावे, हे माझ्या वडिलांना कधीच पटत नाही. स्वतःची ताकद स्वतः निर्माण करा, व्यवसाय उभे करा. मगच योग्य निर्णय घ्या. अशी वडील खासदार महाडिक यांची शिकवण असल्याने सध्या आम्ही त्या दृष्टीने व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. वडिलांना त्यांच्या राजकारणात आम्ही मदत करतो इतकेच. जोपर्यंत आई आणि वडील कांही सांगत नाहीत. तोपर्यंत राजकारणाविषयी मी कोणताच निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट मत धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी व्यक्त केले. राजकारणात आमदार, खासदार व्हायची महत्त्वाकांक्षा आहे का? या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

शहराचा विकास व्हायचा असेल तर येथे उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था यायला हव्यात. त्या दृष्टीने खासदार धनंजय महाडिक यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था नजीकच्या काळात कोल्हापुरात येतील, असा विश्‍वास पृथ्वीराज महाडिक यांनी  व्यक्त केला.

कोल्हापूरची जनता ही नेहमीच उमेदवार आणि त्याचे विचार, कर्तृत्व बघून मतदान करत आली आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी केलेल्या कामाची पोचपावती जनता मतपेटीतून नक्कीच त्यांना देईल, असा विश्‍वासही पृथ्वीराज महाडिक यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सकाळच्या सरकारनामा पानासाठी पृथ्वीराज महाडीक यांची मुलाखत घेतली. श्री. महाडिक कांही दिवसांपासून धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. युवा वर्गाच्या संघटनावर त्यांचा भर आहे. ते स्वतः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करीत आहेत. युवकांनी नोकरी, व्यवसायाबरोबरच शेतीमध्येही लक्ष घालायला हवे. एकाच कुटुंबातील सर्वांनी शेती अथवा सर्वांनीच नोकरीत असू नये. एकाने नोकरी, दुसऱ्याने व्यवसाय, तिसऱ्याने शेती केली तर एकमेकांना ते साथ देऊ शकतात, हा माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा विचार आपल्याला चांगलाच भावल्याच त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक आणि त्या तयारीविषयी ते म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत मी ७५० गावांचा दौरा केला आहे. युवकवर्गासह सर्व स्तरातील मतदारांचा खासदार महाडिक यांना उत्‍स्‍फूर्त पाठिंबा आहे. भागीरथी महिला मंडळाच्या माध्यमातून अरुधंती महाडिक यांनी राबविलेल्या उपक्रमांनी एक वेगळीच ताकद निर्माण झाली आहे. खेड्यापाड्यातही धनंजय महाडिक यांच्या पाठीमागे महिला वर्गाची मोठी ताकद उभी राहिल्याचे दिसते.

आत्तापर्यंत ६५ हजारांहून अधिक महिलांनी महिला मेळाव्यात उपस्थिती लावली आहे. केवळ निवडणुकीपुरतेच हे काम नसते तर अखंडपणे अरुंधती महाडिक युवती, महिलांसाठी कार्यरत असल्याने ही एक मोठी ताकद आज उभी आहे. भिमा कृषी प्रदर्शनात बचत गटांना २०० स्टॉल्स मोफत दिले जातात. आजरा येथील कांही गटही या कृषी प्रदर्शनात सहभागी झाले होते. त्यांची सर्व व्यवस्था येथे केली होती. या बचत गटाला ९० हजाराचा फायदा झाला.

असे उपक्रम महिलांची उन्नती साधणारे आहेत. त्यामुळे महिलांची ताकद ही खासदार महाडिकांच्या मागे निश्‍चितपणे उभी राहिल्याची मला खेड्यापाड्यामध्येही पहायला मिळाले. विविध वाचनालयाच्या माध्यमातून तीन लाख पुस्तके आपण दिली आहेत. कोल्हापूरचा युवक हा विचारधारा ओळखणारा आहे. नेहमीच येथील जनतेने उमेदवार आणि त्याचे कर्तृत्व पाहूनच मतदान केले आहे. या निवडणुकीतही हा अनुभव येणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com