
सांगली- सांगलीतील एका सहकारी बॅंकेच्या शाखेतील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाचा काल (शनिवारी) रात्री साडेबाराच्या सुमारास अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय विभागास मिळाला. त्याची माहिती घेतली असता त्याने परदेश प्रवास केला नसल्याचे आढळून आले आहे. तो कोणाच्या संपर्कात आला याचा शोध घेण्यासाठी बॅंकेतील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
इस्लामपूर येथील कोरोनाबाधित सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु होती. शिवाय शहरात गेल्या महिनाभरात एकही रुग्ण न आढळल्याने नागरिक निर्धास्त होते. मात्र आज सकाळीच सांगलीतील विजयनगर परिसरात एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त सोशल मिडियावरुन शहरात वाऱ्यासारखे पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, विजयनगर येथे राहणारी ही व्यक्ती गणपती पेठेतील एका सहकारी बॅंकेच्या शाखेत काम करत आहे. दोन दिवसांपुर्वी ता. 16 रोजी त्याला त्रास होऊ लागल्यावर एका खासगी डॉक्टरांकडे तपासणी केली. त्याला न्युमोनियाची लक्षणे असल्याने ता. 17 रोजी त्याला मिरजेच्या "कोवीड 19' या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा स्वॅब तपासणीस पाठवला होता. त्याचा अहवाल काल (शनिवारी) रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास प्रशासनास प्राप्त झाला. हा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. महत्वाचे म्हणजे या व्यक्तीचा इतिहास तपासला असता त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्याला न्युमोनिया झालेला होता. तरीही त्यास कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध घेतला जात आहे. त्याच्या संपर्कात कोण कोण आले हे पाहण्यासाठी बॅंकेतील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
एक किलोमीटर कंटेन्मेंट झोन
कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल प्राप्त झाल्यावर प्रशासनाने तातडीने आज सकाळपासूनच या व्यक्तीच्या घरापासून एक किलोमिटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. येथे 55 ठिकाणी बॅरिकेटस् लावण्यात आलेले आहेत. तेथे सिंगल एन्ट्री ठेवण्यात आलेली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या भागातून कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. येथील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू तसेच अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येणार आहेत. तसेच पाच किलोमिटरचा परिसर हा बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. तेथील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेव्यक्तीरिक्त बाहेर पडल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
27 जण हायरिस्कमध्ये
कोरोनाबाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील म्हणजे त्याचे कुटुंबिय, नातेवाईक, सहकारी इतर निकटच्या संपर्कात असलेले अशा 27 जण हायरिस्क असून त्यांना संस्था विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर इतर 43 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. महापालिकेकडून या रुग्णाच्या घराच्या परिसरातील कंटेन्मेंट झोनमधील घरांची तपासणी करण्यासाठी 40 पथके तयार करण्यात आली आहेत. पन्नास कुटुंबांना एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे. कोणाही व्यक्तीस ताप, सर्दी, खोकला असेल तर त्याची माहिती यानिमित्ताने मिळणार असून आवश्यकता भासल्यास त्या व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटचाल करीत असला तरी नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही. आवश्यक ती खबरदारी घेतलीच पाहिजे. पोलीस आणि वैद्यकीय प्रशासन त्यांचे कार्य करीत आहेत. नागरिकांनीही यामध्ये जबादारीने सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.
सोशल मिडयावर अफवा पसरवल्यास कारावास
कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याबद्दल बोलताना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सोशल मिडियावर अफवा पसरवल्यास ग्रुप ऍडमीनवर तसेच पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रसंगी कारवास होऊ शकतो. ही काही गंमत करायची वेळ नसल्याचाही इशारा डॉ. चौधरी यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.