
परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला.
पेड (सांगली) : पेड परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. आता पावसाचे हे घाव विसरून कशीबशी पैशाची तजवीज करीत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेतीची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू आहे. खरीप हंगामातील पिके तोट्यात गेल्याने रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची मदार अवलंबून आहे.
शेतकऱ्यांनी खाजगी कर्ज काढून, उसनवारी करून, वेळप्रसंगी बॅंका किंवा सोसायटीची कर्जे काढून खरीप हंगामातील पेरणी केली होती. यंदा मात्र चांगला बहरलेला खरीप हंगामातील पिकांचा घास पावसामुळे हिरावून घेतला. खरिपाची पिके हातची वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. खरीप हंगामातील मशागत व पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची झाली आहे.
हेही वाचा - चालत्या रोरो वरून ट्रक कोसळला अन्...
पेड परिसरात पावसाने उघडीप दिल्याने रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. तसेच अजून शेतशिवारात काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाफसा नसल्याने रब्बीची पेरणी उशिराने होणार आहे. तसेच परिसरात परतीच्या पावसाने विहिरी, तलाव, तुडुंब भरले असून, या पाणीसाठ्यांचा उपयोग सिंचनासाठी होणार आहे. पेड परिसरातील अनेक गावांत या वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने ज्वारी, मका यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या पावसाने ओढे, नाले, बंधारे, तलाव, विहिरी ह्या तुडुंब भरल्या आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षातील सर्वात मोठा पाऊस झाल्याने पाणीसाठयात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
खरीप हंगाम हातचा गेला असला तरी रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. परतीचा पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्वारी, मका व अन्य पिकांची काढणी करून जमिनीची मशागत करून रब्बी पिकांच्या पेरणीला सुद्धा सुरुवात केली आहे. सध्या शेतकरी गहू, हरभरा या पिकांची पेरणी करीत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गहू, हरभरा या पिकांचा पेरा मोठया प्रमाणात होणार आहे. सध्या शेतकरी ट्रॅक्टर तसेच बैलजोडींच्या सहाय्याने मशागती करीत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - जावयांना आले सुगीचे दिवस -
पैशाची तजवीज करताना बळीराजाची दमछक
खरिपाची पिके हातची वाया गेल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी, पैसे घेऊन रब्बीची बी बियाणे, खते उधारीवर आणून ताळमेळ केला आहे. पिकविम्याचे पैसे तसेच शासनाची नुकसानभरपाई ही रब्बी पिकांच्या तोंडावर मिळाल्यास मोठ्या प्रमाणात पैसाची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
संपादन - स्नेहल कदम