Ghotavade accident : तारळे परिसरासाठी बुधवार "ब्लॅक-डे' 

सुरेश साबळे
गुरुवार, 11 जुलै 2019

कसबा तारळे - राधानगरी तालुक्‍यातील घोटवडे नजीक झालेल्या भीषण अपघातात कसबा तारळे येथील दोन युवकांसह पिरळ पैकी डुबलवाडी व सोन्याची शिरोली येथील दोन अशा चौघांचा मृत्यू झाला. या चौघांची अचानक झालेली एक्‍झिट परिसराला चटका लावून गेली. या तीन गावांसह अपघातातील जखमी असलेल्या तरुणांच्या गावांसाठीही आजचा दिवस हा "ब्लॅक-डे' ठरला. 

कसबा तारळे - राधानगरी तालुक्‍यातील घोटवडे नजीक झालेल्या भीषण अपघातात कसबा तारळे येथील दोन युवकांसह पिरळ पैकी डुबलवाडी व सोन्याची शिरोली येथील दोन अशा चौघांचा मृत्यू झाला. या चौघांची अचानक झालेली एक्‍झिट परिसराला चटका लावून गेली. या तीन गावांसह अपघातातील जखमी असलेल्या तरुणांच्या गावांसाठीही आजचा दिवस हा "ब्लॅक-डे' ठरला. 

दरम्यान, कसबा तारळेतील दोन युवक या अपघातात दगावल्याने गावावर शोककळा पसरली. येथील बाजारपेठ बंद ठेवून दोन्ही युवकांना गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. 
येथील ऋषिकेश राजेंद्र पाटील (वय 22) गेल्याच वर्षी गोकुळ दूध संघात नोकरीस लागला होता. सामान्य कुटुंबातील ऋषिकेश मित्रपरिवारासह नातेवाईकांत लाडका होता. गोकुळ शिरगाव एमआयडीसीत काम करणाऱ्या तरूणांसोबत तो एकटाच गोकुळ दूध संघाचा कर्मचारी आज अपघातग्रस्त ठरलेल्या गाडीनेच रोज प्रवास करायचा. आज सकाळी सहाच्या दरम्यान तो गाडीत इतर कामगारांसोबत बसला.

तत्पूर्वी कृष्णात दिनकर गुरव हाही एमआयडीसीत केवळ तीन आठवड्यांपूर्वी रुजू झालेला गाडीत बसला. गाडीने वेग घेतला,पुढे गुडाळ, खिंडी व्हरवडे ,आणाजे, आवळी येथील कामगारांना गाडीत घेत गाडी सुसाट वेगाने निघाली. आणि घोटवडेनजीक झालेल्या भिषण अपघातात या दोघांसह गाडीचा चालक साताप्पा बळवंत गुरव व मालक प्रकाश मारूती एकावडे या चौघांचा मृत्यू झाला. 

ऋषिकेशचे शिक्षण कसबा तारळे व कोल्हापुरात झाले होते. कमी वयात त्याला 'गोकुळ' सारख्या ठिकाणी नोकरी लागल्याने सर्व कुटुंब आनंदात होते आणि आज अचानक नोकरीवर जातानाच त्याच्यावर काळाने झडप घातली. त्याच्यामागे आजी-आजोबा ,आई-वडील, लहान भाऊ, चुलते ,चुलती असा परिवार आहे. कृष्णात गुरव हा केवळ तीन आठवड्यांपूर्वी तो एमआयडीसीत नोकरीस लागला होता. त्याचे वडील शेतकरी असून तो एकुलता एक होता. त्याच्या मागे आई-वडील, बहीण, चुलते ,चुलती असा परिवार आहे. गाडी मालक प्रकाश हे डुबलवाडी येथे स्थानिक राजकारण व समाजकारणात सक्रिय होते. शिवाय एमआयडीसीत ते कामगारांचे नेतृत्वही करत होते. त्यांना तीन मुली असून आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

सोन्याची शिरोली येथील साताप्पा गुरव हा प्रकाश यांच्या गाडीवर चालक म्हणून दोन वर्षे काम करत होता. तोही अविवाहित असून घरी आई व हृदयाची शस्त्रक्रिया झालेले वडील, बहीण आहे. तो एकटाच कमावणारा असल्याने त्याचे कुटुंबही उघड्यावर पडले आहे. याशिवाय पिरळ, कुडूत्री, गुडाळ, खिंडी व्हरवडे, आणाजे आवळीतील तरूण एमआयडीसी कामगार म्हणून काम करीत होते. तेही या अपघातात जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. 

कमावत्यांवर काळाचा घाला 

  • ऋषिकेश पाटील वर्षापुर्वीच गोकुळमध्ये नोकरीला 
  • कृष्णात गुरव तीन आठवड्यांपूर्वीच एमआयडीसीत 
  • कामाला लागले ते एकुलते एक होते 
  • प्रकाश एकावडे कामगारांचे नेतृत्वही करत होते 
  • चालक साताप्पा गुरव घरी एकटाच कमावणारा आधार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhanagari Ghotavade accident special story