esakal | 71 गावांतील 42 हजार विद्यार्थ्यांची भरतेय रेडिओ शाळा 

बोलून बातमी शोधा

Radio schools for 42,000 students in 71 villages}

जत तालुक्‍यातील जालीहाळ परिसर व कर्नाटक सीमाभागातील 71 गावांतील 42 हजारांवर विद्यार्थ्यांसाठी रेडिओ शाळा भरते आहे.

71 गावांतील 42 हजार विद्यार्थ्यांची भरतेय रेडिओ शाळा 
sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : जत तालुक्‍यातील जालीहाळ परिसर व कर्नाटक सीमाभागातील 71 गावांतील 42 हजारांवर विद्यार्थ्यांसाठी रेडिओ शाळा भरते आहे. या भागातील कम्युनिटी रेडिओ येरळावाणीने कोरोना टाळेबंदीत शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सुरू केलेला हा उपक्रम टाळेबंदी संपली तरी सुरू आहे. येरळावाणी 2 लाख 25 हजार लोकसंख्येपर्यंत पोहोचते. या लोकसंख्येत पहिली ते दहावीपर्यंत 42 हजार 500 विद्यार्थी नोंद आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांना येरळावाणीच्या रेडिओ शाळेचा लळा लागला आहे. 

कोरोना टाळेबंदीत शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा आदेश दिला, मात्र जत सारख्या भागाच्या अडचणी शासन यंत्रणेला काय कळणार? ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्‍यक ऍन्ड्रॉईड मोबाइल-इंटरनेट अशा सुविधा आणायच्या कोठून? या भागात स्वयंसेवी काम करणाऱ्या येरळा प्रोजेक्‍ट्‌स सोसायटीच्या हाती येरळावाणी कम्युनिटी रेडिओ होता. जो आधीच घराघरात पोहोचला होता. 15 एप्रिल 2020 पासून येरळाची रेडिओ शाळा सुरू झाली आणि अखंड दहा महिने अविरतपणे ही रेडिओ शाळा आता सुरू आहे. 

सुरवातीला मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांच्या कथा, कविता यांचे कथन स्पष्टीकरण चर्चा स्वरूपात करायला सुरवात झाली. व्याकरणासारखा कठीण भाग स्पष्टीकरण व उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यातही शिक्षक यशस्वी झाले. मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांमधून "येरळावाणी'चे काम चालते. कारण इथले सारे व्यवहार या दोन्ही भाषेतून असतात. शिक्षकही असेच अध्यापन करतात. कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झाले आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया येऊ लागल्या. मग शिक्षकही जबाबदारीने पूर्वतयारी-अभ्यासाने कार्यक्रम देऊ लागले. "येरळा'च्या शाळेचे (स्कोप) चे सर्व शिक्षक झूम ऍप व गुगल मीट हाताळत होतेच. तेच रेडिओवरून सुरू झाले. आधी रेकॉर्ड होत असल्याने प्रत्यक्ष अध्यापनातील चुकांचे प्रमाण फार कमी झाल्या. हेच प्रसारण गरजेनुसार पुनः पुन्हा सुरू झाले. रेडिओ शाळेमुळे श्रवण कौशल्याचा विकास होत असल्याचे शिक्षकांचे निरीक्षण आहे. 

सुरवातीला केवळ "येरळा'च्या शाळेसाठीचा उपक्रम त्या परिसरातील 71 गावांतील सर्वच शाळांसाठी उपयोगी ठरू लागला. विद्यार्थी मग फोन करून शिक्षकांना शंकानिरसन करू लागले. दररोज पुढचा रेडिओ क्‍लास शंका निरसनानेच सुरू होतो. या भागात 15 माध्यमिक शाळा आहेत. या शिक्षकांनाही या उपक्रमाचा फायदा सुरू झाला. कम्युनिटी रेडिओचा असा प्रभावी वापर दुर्गम- दुर्लक्षित जत तालुक्‍यात होतो आहे. हा कम्युनिटी रेडिओमधील आदर्शच आहे. 

जत आणि कर्नाटकातूनही मुलं आमचे कार्यक्रम ऐकतात. पालक-शिक्षक सूचना करतात. त्यानुसार आम्ही बदल करतो. त्यातून अध्यापनाचा दर्जा सुधारत गेला. मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषांचा वापर, गणित-विज्ञान विषयांचेही अध्यापन करण्यात आमचे शिक्षक यशस्वी झाले आहेत.'' 
- सुजाता कांबळे, शिक्षक, स्कूल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन अँड ज्युनिअर कॉलेज, जालीहाळ बु. 

टाळेबंदीमुळे रेडिओ शाळा सुरू झाली. तिचे महत्त्व आमच्या लक्षात आले. आता पुढील शैक्षणिक वर्षात हे कार्यक्रम अधिक दर्जेदार व्हावेत यासाठी इंटरनेटवरील ध्वनिफितींचा वापर करणार आहोत. अन्य शाळांमधील शिक्षकही आता योगदान देत आहेत. येरळावाणी रेडिओ स्कूलिंगचे आदर्श उदाहरण ठरेल.'' 
- एन. व्ही. देशपांडे, सचिव येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली