Raid On 12 Private Money Lenders In Kolhapur
Raid On 12 Private Money Lenders In Kolhapur

कोल्हापुरातील 'या' 12 खासगी सावकारांवर धाड 

कोल्हापूर - शहर व तालुक्‍यात विनापरवाना खासगी सावकारी करणाऱ्या 16 सावकारांच्या घरावर आज सहकार विभागाने धाड टाकली.  यात कोल्हापुरातील उद्यमनगर येथे राहणाऱ्या नारायण गणपत जाधव व त्यांच्या नातेवाइकांच्या घरात टाकलेल्या धाडीत रोख 27 लाखांसह सोन्या-चांदीचे दागिन्यांचे मोठे घबाड मिळून आले. इतर सावकारांच्या घरात कोरे धनादेश, संचाकारपत्र, काढून घेतलेली वाहने, त्याचे पेपर असा मुद्देमाल सापडला. यापैकी एकाही सावकारांकडे अधिकृत परवाना नव्हता. कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, कारवाईचे सामान्यांतून स्वागत होत आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनीही ही माहिती पत्रकारांना दिली. 

जिल्ह्यात कारवाई केलेले 12 सावकार विनापरवाना सावकारी करत असल्याच्या लेखी तक्रारी सहकार विभागाकडे दाखल झाल्या होत्या. तक्रारींच्या अनुषंगाने आज सकाळी नऊ वाजल्यापासून 16 पथकांच्या मदतीने कोल्हापूर शहरातील पाच, तर ग्रामीण भागातील 11 सावकारांच्या घर, कार्यालय, फॉर्म हाऊस, दुकाने अशा ठिकाणी हे छापे टाकले. छापा टाकलेल्या ठिकाणांहून कोरे धनादेश, स्टॅंम्प पेपर, संचकार पत्र, जमिनीची कागदपत्रे आदी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. कारवाईत सहकार विभागाचे 52, पोलिस कर्मचारी 48, पोलिस अधिकारी 5 यांचा समावेश होता. एकाही सावकाराने कारवाईला विरोध केला नसल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

फार्म हाऊस, दुकानावर एकाचवेळी धाड

उद्यमनगरातील नारायण गणपती जाधव यांचे बंधू तुळशीदास, पुतणे अभिजित यांच्या उद्ममनगर, राजारामपुरी येथील घर, अंबप, कळंबा येथील फार्म हाऊस व पाच बंगला परिसरातील यश टायर्स या दुकानात एकाचवेळी ही धाड टाकली. त्यात 27 लाख रुपये रोख व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह आठ धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर, नऊ बॉंड, खरेदी पत्राच्या झेरॉक्‍स प्रती असे घबाड सापडले. रोख रकमेबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती दिली असून, त्यांच्याकडून पुढील कारवाई करणार असल्याने ही रक्कम जप्त केलेली नसल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 


सावकारांची नावे, पत्ता व सापडलेले घबाड असे 

  •  नारायण गणपती जाधव - रा. उद्यमनगर, कळंबा येथील घर - 27 लाख रोख, सोन्या-चांदीचे दागिने, खरेदीपत्रांच्या झेरॉक्‍स 
  • तुळशीदास गणपत जाधव व अभिजित तुळशीदास जाधव- अंबप, यश टायर्सवर धाड- आठ धनादेश, नऊ बॉंड, 17 खरेदीपत्रे 
  • किशोर बाबूराव सुर्वे व रूपेश किशोर सुर्वे - रा. टेंबे रोड, शिवाजी स्टेडियम- 17 कोरे धनादेश व 3 कोरे बॉंड 
  • राहुल रमेश अवधूत- रा. लोणार गल्ली, शनिवार पेठ- 1 कोरा धनादेश, 1 कोरा बॉंड 
  • आनंदा शामराव चिबडे-रा. राधानगरी- 20 जुन्या तारखांचे कोरे स्टॅम्प (स्वतः स्टॅम्प विक्रेते आहेत) 
  • अरविंद शिवाजी एकल - रा. चिमगांव, ता. कागल- 6 खरेदीपत्रे, 8 संचाकार पत्रे 
  • संजीवकुमार बाजीराव सूर्यवंशी-रा. मुरगूड- तक्रारदारांच्या नावे केलेला दस्त 
  • विजय नामदेव पाटील-कूर, ता. भुदरगड- दोन कोरे धनादेश 
  • तानाजी कृष्णा पाटील- रा. मुदाळ, ता. भुदरगड- तक्रारदाराची मोटार व या वाहनाची कागदपत्रे 

यांच्याकडे काही सापडले नाही 

कारवाईत दगडू शेणवी (रा. मुरगूड), अनिल चव्हाण, (रा. गारगोटी) व मारुती जाधव (रा. गंगापूर, ता. गारगोटी) यांच्या घरावरही धाड टाकली, पण त्यांच्याकडून कोणतेही आक्षेपार्ह कागदपत्रे किंवा सावकारीशी संबंधित पुरावे सापडले नसल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

एकाकडेही परवाना नाही 

खासगी सावकारीसाठी सहकार विभागाकडून परवाना घेणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत असे 255 लोकांना परवाने दिलेले आहेत. आज कारवाई केलेल्या 12 सावकारांपैकी एकाकडेही असा परवाना नव्हता. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर पोलिसात फिर्याद देण्यात येईल. या सर्व कारवाईचे व्हिडिओ शूटिंगही केल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com