
पावसाळ्यात तानंग, कुपवाडपासून छोट्या नाल्यांचे पाणी कृष्णा नदीत नेऊन सोडणारा सुमारे पंचवीस मीटर रुंदीचा ओढाच रेल्वेने गिळंकृत केला आहे.
मिरज (जि. सांगली ) : पावसाळ्यात तानंग, कुपवाडपासून छोट्या नाल्यांचे पाणी कृष्णा नदीत नेऊन सोडणारा सुमारे पंचवीस मीटर रुंदीचा ओढाच रेल्वेने गिळंकृत केला आहे. नेहमीप्रमाणे रेल्वेच्या या बेकायदा कृत्यास महापालिकेचाही हातभार लागला आहे. हा ओढा पूर्ण मुजल्याने पावसाळ्यात याचा मोठा फटका निम्म्या मिरज शहरास बसणार आहे. तरीही महसूल प्रशासन याबाबत गप्प आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे 18 डिसेंबर आणि 22 जानेवारी रोजी भेटीसाठी मिरजला येत आहेत. त्यांना रेल्वे स्थानकाचा परिसर चकाचक असल्याचे भासवण्यासाठी रेल्वेतील स्थानिक अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून हा ओढा बुजवण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी महापालिकेतील काही कारभाऱ्यांनाही रेल्वे प्रशासनातील चतुर अधिकाऱ्यांनी ठेकेदारांमार्फत हाताशी धरले आहे. सध्या रेल्वेच्या विद्युतीकरणाचे आणि विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने, रेल्वेने आजूबाजूच्या सर्व जागा ताब्यात घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून रेल्वेने
मालधक्क्यानजीकचा हा 25 मीटर रुंदीचा मोठा ओढाच मुजवण्याचे ठरवले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्यांच्या सर्व ठेकेदारांना रेल्वेचा सर्व कचरा आणि राडारोडा ओढ्यात टाकण्याचे फर्मान काढले.
महापालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही कारभाऱ्यांच्या आदेशास अनुसरून गावातील कचरा आणि राडारोडाही याच ओढ्यात टाकला गेल्याने हा ओढा दोन वर्षांपासून मुजवण्यास सुरवात झाली. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. दीड वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर संगीता खोत यांनी भेट देऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याबाबत खडे बोल सुनावले. परंतु त्यानंतर नेहमीप्रमाणे काहीच घडले नाही आणि ओढा मुजवण्याचे काम नव्या दमाने सुरू झाले. सध्या हे काम ठेकेदाराने संपवत आणले आहे. तरीही महापालिका दूरच, पण महसूल प्रशासनही याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. एखाद्या मोठ्या पावसानंतर जेव्हा मोठा परिसर पाण्याखाली जाईल तेव्हाच याचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात येणार आहे.
ओढा मुजल्याने बाधित होणारा परिसर
भारत पेट्रोलिअम, इंडियन ऑईल डेपो, चंदनवाडी, परमशेट्टी हॉस्पिटल, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल परिसर, वंटमुरे कॉर्नर, शासकीय दुग्धालय, आंबेडकर बाग परिसर, मराठे मिल चाळ, माणिकनगर रोड, प्रताप कॉलनी, मुख्य पोस्ट कार्यालय, रेल्वे स्थानक
एक लाख लोक संख्येस फटका
एवढ्या मोठ्या आकाराचा नैसर्गिक ओढा मुजवल्याने या परिसरातील किमान एक लाख लोकसंख्येच्या परिसरास याचा मोठा फटका पावसाळ्यात बसू शकतो. यावर्षीच्या पावसाळ्यातच याची झलक दिसली आहे. रेल्वे स्थानकापासून ते वंटमुरे कॉर्नर परिसरातील सांडपाणी किमान महिनोंमहिने तुंबून राहिले होते. यापुढे ही समस्या प्रत्येकवर्षी धोका संभवतो.
नाले मुजवण्याचा अधिकारच रेल्वेस नाही
कोणताही परिसर रेल्वेच्या ताब्यात असला, तरी तेथील नैसर्गिक ओढ्या नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यास पर्यायी मार्ग निर्माण केल्याशिवाय हे ओढे नाले मुजवण्याचा अधिकारच रेल्वेस नाही. त्यामुळे हा ओढा मुजवणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हाच दाखल करावा.
- संगीता खोत, माजी महापौर
मोठा फटका सर्व वसाहतींना बसणार
एवढ्या मोठ्या रुंदीचा आणि प्रचंड प्रमाणात कृष्णा नदीकडे पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून नेणारा हा मोठा ओढा मुजवला गेल्याने याचा मोठा फटका रेल्वे स्थानकापासून ते वंटमुरे कॉर्नरसह सांगली- मिरज रस्त्यावरील सर्व वसाहतींना बसणार आहे. याची जाणीव महापालिका आणि रेल्वेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना नसणे शक्य नाही. त्यामुळे या निसर्गविरोधी गुन्हेगारी कृत्याची मोठी किंमत महापालिका आणि रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निश्चित मोजावी लागेल.
- तानाजी रुईकर, माहिती अधिकार कार्यकर्ते, मिरज
संपादन : युवराज यादव