रेल्वे, बस, विमान, शाळा सारं सुरळीत; कोणत्या देशात ? 

e
e

स्वीडनच्या अंगवळणीच फिजिकल डिस्टन्सिंग आहेत. मुख्यत्वे शहरातच लोक राहतात. त्यामुळे इथे नेहमी गर्दी असते. जगभर कोविडविरोधात लढण्यासाठी टाळेबंदीचा नारा दिला असताना इथल्या शासनाने मात्र टाळेबंदी होणार नाही हे आधीच जाहीर केले. त्याचवेळी म्हणजे साधारण 15 मार्चपासून आपण यापुढे कसे वागायचे याचे काटेकोर नियम मात्र जाहीर झाले. त्यासाठी माध्यमांमधून प्रसिध्दीब-घरोघरी पत्रके वाटप झाले. त्यामुळे आजही इथे बस-रेल्वे, हॉटेल्स, बार, दुकाने असं सारं काही जसंच्या तसं सुरु आहे. अगदी विमानेही. ज्यांना घरून काम करता येणे शक्‍य आहे त्यांनी ते करावे; मात्र सक्ती नाही. कमीत कमी प्रवास करा; त्यामुळे रेल्वेच्या पुर्ण डब्यात अवघे चार ते पाच प्रवासी दिसतील. शाळा-महाविद्यालये सुरु आहेत; मुलं सुरक्षित अंतरावर बसून शिकताना दिसतील. पन्नासहून अधिक लोकांनी एकत्र यायचे नाही. तशी शक्‍यता असणारी चित्रपटगृहे-संग्रहलये तेवढी बंद आहेत. एरवीही लोक सुरक्षित अंतर ठेवूनच राहतात. त्यामुळे "डिस्टन्सिंग' पाळण्यासाठी इथे फार काही करावे लागले नाही. हे नियमपालन स्वमर्जीनेच. 
इथे खूप कमी सूर्यदर्शन होत असल्याने लोकांना ड जीवसत्वासाठी पुरवणी औषधे घ्यावी लागतात. मात्र एरवी थंडतापासाठी इथे उपचार घेतले जात नाही. अंगभूत प्रतिकार क्षमतेवर बरं झालं पाहिजे असा इथल्या डॉक्‍टरांचा सल्ला नव्हे आग्रह असतो. त्यामुळे माझी मुलगी स्वरा तापाने आजारी पडली तर डॉक्‍टरांनी तिला थोडे दिवस विश्रांती घेऊ द्या असा सल्ला देत औषधाविना परत पाठवलं. पण इथं सारे काही वैद्यकीय उपचाराचा खर्च शासन करते. आरोग्य व्यवस्था दर्जेदार आहे. 
सध्याच्या महामारीला सामोरे कसे जायचे याचा नेमका आराखडा सरकारकडे आहे. त्याबाबतचे सारे काही निर्णय तज्ज्ञ समितीच करते. तेच त्याची घोषण करतात. अँडर्स टेगणेल यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व्यवस्थेची टीम सर्व पातळ्यांवर काटेकोरपणे काम करतेय. जो काही निर्णय करायचा आहे तो निर्णय त्यांची तज्ज्ञ समितीच करते. इथे सरसकट चाचण्यांचा सपाटा नाही. लक्षणं दिसत असतील घरीच थांबा. कॉल करा डॉक्‍टरच तुमच्याकडे येतील. आवश्‍यक वाटल्यास तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातील. गेल्या आठवड्यात मला थोडा त्रास वाटला तर त्यांनी तपासणी केली आणि फक्त विश्रांतीचा सल्ला दिला. तसं माझं "वर्क फ्रॉम होम'च सुरु आहे. 
देशांतर्गत सारे काही सुरळीत सुरु असल्याने इथल्या तळागाळातल्या नोकऱ्या-अर्थकारणाला कोणताही आर्थिक फटका बसलेला नाही. स्कॅनिया या ट्रक बनवणाऱ्या माझ्या कंपनीचं कामकाज नियमित असलं तरी जगभरातील टाळेबंदीमुळे आयात ठप्प झाल्याने शिफ्ट कमी झाल्या आहेत. त्यामुळे या महामारीचा जो काही आर्थिक फटका बसला आहे तो आमच्यासारख्या कंपन्यांनाच. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत माझ्या पगारातील 47 टक्के वाटा शासन देतेय. माझी फक्त सात टक्के पगार कपात झाली आहे. इथे कामगारांना सुरक्षा आहे. त्यांच्या संघटनांचा दबदबा. तसे कायदेही आहेत. इथे आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेची जबाबदारी शासनाचीच असते. ज्येष्ठांसाठी शासनाच्या निवृत्तीवेतनापासून आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत. आपल्यासारखी इथे एकत्र कुटुंब पध्दती नाही. ज्येष्ठ मंडळी इथे वृध्दाश्रमातच राहतात. मात्र ते सक्तीने नव्हे मर्जीने. तिथं त्याचं जगणे सुसह्य करणाऱ्या साऱ्या सुविधा असतात. आई-वडिलांना भेटायचं झालं तरी मुलं तिथं जाऊन भेटतात. या देशात ज्येष्ठच नव्हे तर प्रत्येक जण व्यायामासह आरोग्याबाबत दक्ष असतो. इथलं सरासरी आयुर्मान 83 आहे. त्यामुळे ज्येष्ठांची संख्या खूप मोठी आहे. गेल्या आठवड्यात माझा स्विडीश सहकारी त्याच्या वडिलांना भेटायला गेला तर त्यांने जमिनीवरुन गच्चीत उभ्या वडिलांशी गप्पा मारल्या. 

जगभर महामारीने हाहाकार माजला असताना स्वीडन मात्र शांत-ठामपणे उभा आहे. इथे कोरोनाची टीव्हीवरील बातमी फक्त अपडेट देण्यापुरतीच असते. याचा अर्थ इथे कोरोनाचे रुग्ण नाहीत असे नाही. आत्तापर्यंत 3600 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. तीस हजारांवर चाचण्या झाल्या आहेत. मात्र म्हणून टीव्हीवर रोज कोरोना रुग्णांची भयावह आकडेवारी सांगितली जात नाही तर फक्त वर्तन-व्यवहाराबाबतच्याच सूचना असतात. त्याही तज्ज्ञच सांगतात. भितीचे नव्हे तर सकारात्मक दृष्टीकोन राहील असे टीव्ही चॅनेलवर प्रक्षेपण असते. पंतप्रधान स्टीफन लोफवें कधी तरीच टीव्हीवर दिसतात. जगभरातील लोक आजही स्वीडनमध्ये येऊ शकतात. मात्र त्यांना काटेकोरपणे नियम शिस्त पाळावी लागते. त्यामुळे शेजारील अनेक देशातील लोक टाळेबंदीत निवांतपणे रहायला म्हणून इथे येत आहेत. स्वीडनचे हेच मोठे यश आहे. कोरोनाला सामोरे कसे जायचे याचे नेमकं आकलन शासनाला आहे आणि ते इथल्या नागरिकांनाही ते कळले आहे. 
.......... 
(शब्दांकन ः जयसिंग कुंभार)  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com