कोरोना, अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब शेतात

संजय आ. काटे
गुरुवार, 26 मार्च 2020

नगर जिल्ह्यात श्रीगोंदे, संगमनेर व राहाता तालुक्‍यात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत. श्रीगोंद्यात, विशेषतः पारगाव व बेलवंडी परिसरात मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी द्राक्षबागा केल्या आहेत

श्रीगोंदे : कोरोनामुळे श्रीगोंद्यातील लिंबू व द्राक्षउत्पादकांना मोठा फटका बसला असतानाच, आता अवकाळी पावसाने डाळिंब, कांदा आणि गहू या पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. यामुळे श्रीगोंद्यातील शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. 

नगर जिल्ह्यात श्रीगोंदे, संगमनेर व राहाता तालुक्‍यात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत. श्रीगोंद्यात, विशेषतः पारगाव व बेलवंडी परिसरात मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी द्राक्षबागा केल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून विक्रीयोग्य असलेली द्राक्षे शेतातच राहिली.

एकट्या पारगाव परिसरात एक हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर काढणीयोग्य द्राक्षे शेतात आहेत. काही दिवसांपूर्वी किलोला 55 ते 60 रुपयांपर्यंत असणारा दर गेल्या काही दिवसांत खाली आला आहे. आता तर व्यापारी द्राक्षे उचलत नसल्याने भीती वाटू लागली आहे. लिंबांची तीच अवस्था आहे. श्रीगोंद्यात लिंबूबागांचे क्षेत्र मोठे आहे. सध्या लिंबे शेतातच राहत आहेत. 

एकीकडे कोरोनामुळे शेतीमाल उद्‌ध्वस्त होत असताना, काल (बुधवारी) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अन्य पिकांची मोठी हानी झाली. यात प्रामुख्याने कळी आलेल्या डाळिंबबागा अडचणीत आल्या आहेत. शेतात काढून ठेवलेला विक्रीयोग्य कांदा भिजला असतानाच, काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे. या स्थितीत श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होण्याची भीती आहे. 

कोरोना व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. या दोन्ही अडचणींत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्‍यक आहे. 
- केशवराव मगर, उपाध्यक्ष, नागवडे साखर कारखाना 

कोरोनामुळे व्यापारी माल उचलत नसल्याने मोठ्या अडचणी आहेत. द्राक्षांसाठी मोठा खर्च येत असताना, आता विक्री होत नसल्याने सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मदत करावी. 
- सावता हिरवे, द्राक्षउत्पादक, पारगाव सुद्रिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain damage to grapes, pomegranate gardens