कोल्हापूर-निपाणी महामार्ग ठप्प; रात्रीपासूनच आडवली वाहने

राजेंद्र हजारे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

निपाणी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसासह विविध धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे यमगरणी जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोल्हापूर निपाणी महामार्ग ठप्प झाला आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून निपाणी पोलिसांनी सोमवारी (ता.५)रात्रीपासूनच या मार्गावरील वाहने आडवी आहेत. त्यामुळे मांगुर फाटा आणि यमगरणी बस स्थानक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

निपाणी - निपाणी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसासह विविध धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे यमगरणी जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोल्हापूर निपाणी महामार्ग ठप्प झाला आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून निपाणी पोलिसांनी सोमवारी (ता.५)रात्रीपासूनच या मार्गावरील वाहने आडवी आहेत. त्यामुळे मांगुर फाटा आणि यमगरणी बस स्थानक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यमगरणी येथील जुन्या पुलाबरोबर पाणी वाहत असून अद्याप नवीन पूल पाण्याखाली जाण्यासाठी पाच फूट शिल्लक आहे. रात्री पासून सर्व आणि समोर असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. 

गेल्या दोन दिवसांपासून विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे निपाणीसह परिसरातील वेदगंगा आणि दूध गंगा  नद्यांची पाणीपातळी वाढली असून नदीचे पाणी शेतीवाडी आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने कोल्हापूर निपाणी महामार्गावरील यमगरणी जवळ रस्त्यावर मांगुर फाट्यापर्यंत पाणी पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्ता दिसत नाही. अशावेळी दुर्घटना टाळण्यासाठी मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला, ए. के. नदाफ, बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मांगुर फाटा आणि यमगरणी बस स्थानकाजवळ बॅरिकेट लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याशिवाय उंच भरारी पथकही तैनात करण्यात आले असून निपाणी व सौंदलगा परिसरात पोलीस व्हॅन आणि अंबुलन्स  सेवा देण्यात आली आहे. रस्त्यावर थांबलेल्या सर्वच वाहनधारकांना पाण्यातून न जाण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. 

सोमवारी रात्री मुक्कामाला गेलेल्या अनेक बस मांगुर फाटा आणि यमगरणी परिसरात थांबून आहे त्यामध्ये कोल्हापूर, गडहिंग्लज आणि कागल आगारांच्या बस मोठ्या प्रमाणात आहेत. 

बंगळूर, धारवाड, बेळगाव हुबळी भागातून येणारी सर्व मालवाहतुकीचे सह प्रवासी काड्या निपाणी आणि यमगरणी परिसरात थांबविण्यात आले आहेत. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर कडून येणारे सर्व वाहने कोणी टोल नका आणि सौंदलगा जवळील मांगुर फाटा येथे अडविण्यात आली आहेत. निपाणी जवळच असलेल्या स्तावनिधी घाटात डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे धबधबे वाहत आहेत. पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड माती आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणीही वाहनांना सावकाश सोडले जात आहे येथेही पोलिसासह पूंजीलाई च्या भरारी पथक कार्यरत आहे.

दोन्ही विभागातर्फे रात्री दहा वाजल्यापासूनच महामार्गावर थांबून वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सतत धावणारा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या दहा वर्षानंतर यंदा प्रथमच ठप्प झाला आहे.

दुपारपर्यंत पाऊस उघडल्यास रस्त्यावरील पाणी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. अन्यथा सायंकाळपर्यंत हा महामार्ग बंद राहण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. याशिवाय यमगरणी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेती वाडीत शिरले आहे. त्यामुळे पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेऊन निपाणी परिसरातील शाळांना कालपासून तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निपाणी भागातून  कागल, गोकुळ शिरगाव आणि शिरोली एमआयडीसी जाणाऱ्या सर्वच कामगारांची दुचाकी आणि खाजगी वाहने यमगरणी येथे थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे कामगार पुन्हा आपापल्या गावाकडे परतत आहेत .एकंदरीत कोसळणाऱ्या पावसामुळे ठप्प झालेला महामार्ग पाण्यासाठी परिसरातील नागरिकांची रस्त्यावर गर्दी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Flood Kolhapur Nipani Highway Water Transport Close