वाळव्यात यामुळे बसणार उसाला फटका

पोपट पाटील
Friday, 4 September 2020

ढगाळ हवामान, आर्द्रता आणि अति पावसाने शेतात साचलेले पाणी; तर काही ठिकाणी हुमणीचे वाढते प्रमाण यामुळे तालुक्‍यातील ऊसक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे.

इस्लामपूर (जि.  सांगली) : ढगाळ हवामान, आर्द्रता आणि अति पावसाने शेतात साचलेले पाणी; तर काही ठिकाणी हुमणीचे वाढते प्रमाण यामुळे तालुक्‍यातील ऊसक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. 

चालू हंगामात वाळवा तालुक्‍यात ऊसाचे 35 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. यावर्षी ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढगाळ हवामान, आर्द्रता, साचलेले पाणी यामुळे ऊसावर बुरशीजन्य रोग, लोकरी मावा याचा प्रादुर्भाव झालेला असून, त्यामुळे बहुतांशी ऊसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. 86032 या जातीवर लोकरी मावा, 265 या जातीच्या उसावर पानावरील तपकिरी ठिपके; तर 92005 व 10001 या जातीच्या ऊसावर तांबेरा जास्त प्रमाणात दिसून येत आहे. या मुळे ऊस उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. पाऊस जरी कमी झाला तरी अजूनही नदीकाठच्या शेतात पाणी साचून राहिल्याचे चित्र आहे. शेतात साठलेले पाणी, ढगाळ हवामान आणि अधिक आर्द्रता यामुळे ऊसावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. प्रामुख्याने 265 जातीच्या ऊसावर पानावरील तपकिरी ठिपके,92005 व 10001 या ऊसावर जास्त प्रमाणात तांबेरा दिसून येत आहे. लोकरी मावा, तांबेरा यामुळे खोडवा, गाळपास जाणारी लागण हे क्षेत्र बाधित झाले आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी चालू वर्षी केलेल्या ऊस लागवडीवरसुद्धा याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने तसेच हवामानात सातत्याने बदल होत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून ऊस पिकांची वाढ खुंटली आहे. रोगाचा प्रादुर्भाव व वाढ खुंटल्याने ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. 

शेतातील पाण्याचा निचरा करा

वाळवा तालुक्‍यात 35 हजार हेक्‍टर क्षेतत्रात ऊस पीक आहे. शेतकऱ्यांनी जागृत राहून शेतातील पाण्याचा निचरा करावा, जमिनीत हुमणी असेल, तर हुमणी कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम आनीसोप्ली ही जैविक बुरशी 4 किलो प्रति एकर चांगल्या कुजलेल्या शेणखतात वाढवून वापरावी किंवा BVM (बिव्हेरिया मेटारायझीयम व्हर्टिसिलियम) जैविक बुरशी (2 लिटर प्रति एकर) पाण्यात मिसळून ठिबक अथवा पाट पाण्याने सर्व क्षेत्रात पोहचेल याप्रमाणे द्यावे. 
- भगवान माने, तालुका कृषी अधिकारी 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain & Insects will hit the sugarcane production in the Valava Taluka