अवकाळीचा झटका; द्राक्षपट्टा धास्तावला

जयसिंग कुंभार
Friday, 19 February 2021

बुधवारी मध्यरात्रीनंतर गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाच्या झटक्‍याने द्राक्षपट्टा धास्तावला आहे.

सांगली : बुधवारी मध्यरात्रीनंतर गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाच्या झटक्‍याने द्राक्षपट्टा धास्तावला आहे. काही ठिकाणी गारा कोसळल्या. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटामुळे द्राक्षबागा कोसळल्या, द्राक्षमणी भेगाळले. आज दिवसभरही गारवा असल्याने द्राक्षउत्पादक धास्तावले होते. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांनाही या पावसाचा फटका बसेल. 

हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी वातावरण बदलाचे संकेत दिले होते. काही ठिकाणी पावसाची शक्‍यताही वर्तवली होती. बुधवारी रात्रीपासून हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले. मध्यरात्रीपासून पावसाला सुरवात झाली. तासगाव, कवठेमहांकाळ, जत, पलूस, मिरज पूर्व भागातील द्राक्षबागांचे मणी सध्या गर भरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसाच्या थेंबाचा मार लागून मणी खराब होण्याची शक्‍यता असते.

त्याशिवाय घडात पाणी साठून मणी कुजण्याचीही भीती असते. त्यापासून बचावासाठी सकाळीच द्राक्षबागांवर ट्रॅक्‍टरने प्रेशरचा मारा करून पाणी काढण्याचे काम सुरू होते. तर काही ठिकाणी झाडे हलवून घडात साठलेले पाणी काढण्याची लगबग सुरू होती. सुदैवाने सकाळी तापमान स्थिर राहिल्याने पुढील धोका टळला. मात्र आज दिवसभरही ढगाळ वातावरण, काही ठिकाणी रिमझिम यामुळे टांगती तलवार कायम होती. आजचा दिवस द्राक्ष बागायतदारांसाठी भीतीचा होता. 

पेड परिसरात द्राक्षमणी तडकले 
पेड : मेघगर्जनेसह हलक्‍या पावसाने शेतकरी हबकला आहे. द्राक्ष हंगामाच्या प्रारंभालाच हा झटका बसला आहे. प्रतवारी तसेच मणी फुटण्याची शक्‍यता आहे. परिसरात आगाप द्राक्षबागांतील घडामध्ये पाणी उतरून पूर्णपणे साखर तयार झालेली आहे. या द्राक्षबागा विकण्यासाठी पूर्णपणे तयार झाल्या असताना हा झटका बसल्याने मण्यांना तडे गेले आहेत. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील गहू व हरभरा काढणीसाठी आला असून तो काळा पडण्याची शक्‍यता आहे. मागील हंगामात कोरोनाच्या झटक्‍यातून सावरणाऱ्या द्राक्षबागायतदारांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. 

आंब्याची मोहर गळती 
खरसुंडी ः परिसरातील रब्बी पिकांना फारसे नुकसान नसले तरी आंब्याला मात्र झटका बसण्याची शक्‍यता आहे. पूर्वेकडून ढग पश्‍चिमेकडे गरजत गेले. विजांचा कडकडाट सुरू होता. खरसुंडी, धावडवाडी, कानकात्रेवाडी व नेलकरंजीचा काही भाग असा पाऊस झाला. ऐन थंडीतील या पावसाने या भागातील आंबा फळापुढे संकट असेल. हापूस, केशर, देशी आंब्याला मोहोर आला आहे. या पावसाने फळगळतीची शक्‍यता आहे. रब्बीतील पिके अंतिम टप्प्यात आहेत. तूर्त नुकसानीची शक्‍यता नाही. या भागात वारा नव्हता त्यामुळे पीक वाचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

उद्या-परवा पाऊस? 
जिल्ह्यातील द्राक्षपट्टयात आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहील असा अंदाज "स्कायमेट'ने वर्तवला आहे. तापमान कमी-जास्त होत असल्याने पावसाच्या शक्‍यताही व्यक्त होत आहे. शुक्रवार (ता. 19) व शनिवार (ता. 20) रोजी पाऊस झालाच तर मात्र मोठा अनर्थ होऊ शकतो. काल थोडक्‍यात बचावल्याची भावना आहे. पुढचे दोन दिवस बागायतदारांसाठी चिंतेचे आहे. 

दर कोसळण्याची भीती 
द्राक्ष हंगामाच्या सुरवातीला मार्केटिंगच्या मालाने चांगली उसळी घेतली होती. चार किलोच्या पेटीला चारशे ते पावणेपाचशे रुपये दर मिळाल्याने बागायतदार काहीसे सुखावले होते. मात्र आता पुन्हा दर कोसळण्याच्या भीतीचे सावट आहे. यंदा अतिवृष्टीमुळे फळछाटण्या लांबल्याचा फटका बागायतदारांना बसत आहे. त्यात आता दोन दिवसांपासून पावसाच्या शक्‍यतेने व्यापाऱ्यांकडून मालाचा उठाव बंद झाला आहे. परिणामी दर घसरण्याची भीती आहे. गुरुवारी पहाटेच्या पावसाने व्यापाऱ्यांनी ठरवलेल्या बागातील माल काढणी ठप्प होती. त्यामुळे बागायतदार हबकले आहेत. 

दर कोसळले तर करायचे काय? 
हंगामाची ही सुरवात आहे. जिल्ह्यात अजूनही 75 टक्के माल शिवारातच आहे. पावसाने तोंडचे पाणी पळवले आहे. द्राक्षघडातील पाणी बाहेर काढण्याचा खर्च नवा भुर्दंड आहे. दर कोसळले तर करायचे काय? 
- डॉ. आनंदराव कोरे, द्राक्षबागायतदार, खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) 

पाणी देण्याच्या वेळा निश्‍चित करा
पाऊस झालाच तर मणी तडकण्याची भीती असेल. ते टाळण्यासाठी जीवाणूजन्य, बुरशीनाशक, लिक्विड सल्फर याचा प्राधान्याने वापर करावा. त्यासाठी बागायतदारांनी पाणी देण्याच्या वेळा निश्‍चित कराव्यात. 
- मारुती चव्हाण, प्रयोगशील द्राक्षबागायदार, पलूस 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain ruined vineyards, Rains in drought prone talukas including Miraj East