मिरजेत झोपडपट्ट्यांत शिरले पाणी; शेकडो जणांचे स्थलांतर

प्रमोद जेरे
Friday, 16 October 2020

बुधवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या धुवॉंधार पावसाने मिरज शहरासह पूर्व भागास झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील रस्ते तसेच झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे आणि पूर्व भागातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिरज (जि. सांगली ) : बुधवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या धुवॉंधार पावसाने मिरज शहरासह पूर्व भागास झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील रस्ते तसेच झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे आणि पूर्व भागातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाने शहरातील रस्त्यांसह आणि सखल भागातील घरांचीही ही दैना केली. रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था पावसाच्या पाण्याने पूर्णपणे ठप्प झाली. पूर्व भागातील शेतीच्या नुकसानीचा सहजासहजी अंदाजही करता येणार नाही, एवढा मोठा फटका बळीराजाच बसला आहे. ऊस, सोयाबीन, उडीद, मूग, तसेच द्राक्षबागांचेही प्रचंड नुकसान झाल्याने बळिराजा सलग तिसऱ्या वर्षी नैसर्गिक अरिष्टात सापडला आहे. 

मंगळवारी सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने बुधवारी दिवसभर आणि रात्रभर अक्षरशः धुमाकूळ घातला. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या मालगाव रस्त्यावरील झोपडपट्टीत पाणी शिरले. झोपडपट्टीवासीय झोपेत असतानाच शिरलेले पाणी आणि पाण्याचा वेग पाहून हाताला लागेल ते कपडे आणि आवश्‍यक वस्तू घेऊन ते सुरक्षित ठिकाणी गेले. पहाटेची वेळ असल्याने आणि वीजपुरवठाही बंद असल्याने सरकारी, तसेच महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोचू शकली नाही. त्यामुळे बहुसंख्य झोपडपट्टीवासीयांनी खासगी वाहनाने सुरक्षित ठिकाणी निवारा शोधला.

याच जोरदार पावसामुळे मिरज शहरालगतच्या मालगाव, टाकळी, बोलवाड, तसेच म्हैसाळ रस्त्यावरील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले. त्यामुळे मालगाव टाकळी बोलवाड या तिन्ही गावांना जाणारी वाहतूक आज गुरुवारी दुपारपर्यंत बंद राहिली. म्हैसाळ रस्त्यावरील चिखल ओढा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्याने थेट रेल्वे पुलाच्या रुळापर्यंत धडक मारली. रेल्वेचे अधिकारी या पूरस्थितीवर लक्ष ठेवून होते.

याशिवाय शहरानजीकच्या समतानगर, ख्वाजा वसाहत, गंगानगर, माणिकनगर, जुना हरिपूर रस्ता, चांद कॉलनी, पिरजादे प्लॉट, गणेश कॉलनी, गाढवे कॉलनी हा सर्व परिसर ओढ्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने वेढला गेला. शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था पावसाने केविलवाणी केली. अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या चेंबूरमधूनच पावसाचे पाणी घुसल्याने घराघरांत सांडपाणीही पसरले. अनेक ठिकाणी रस्त्यावर मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरले. एकूणच या पावसाने मिरज शहरासह पूर्व भागात कोट्यवधीचे नुकसान करून कोरोना पाठोपाठ दुसरा दणका दिला. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain water seeped into slums in Miraj; Hundreds of people migrated