पावसाची रिपरिप थांबेना ; कास पठारासह डोंगरांमधील जनजीवन गेले गारटून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

या सततच्या पावसाला जारे... जारे... पावसा म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. 

कास ः गेले दोन महिने मुक्काम ठोकलेला पाऊस अद्यापही उघडीप घेण्याचे नाव घेत नसल्यामुळे पुष्प पठार काससह सह्याद्रीच्या माथ्यावरील डोंगरांमधील जनजीवन गारटून गेले आहे. या सततच्या पावसाला जारे... जारे... पावसा म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. 
 

महाबळेश्वरमध्ये यावर्षी जगातील सर्वांत जास्त पाऊस झालेला आहे. असे असताना महाबळेश्वरपासून कास पठार आणि परिसर अगदीच जवळ आहे. तेवढाच पाऊस या परिसरात झाला आहे. पावसाने रस्त्यांनी शेवाळ पकडले आहे. भात, नाचणी, वरी या डोंगररांगांतील पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसासोबतच कधीही न हटणारे दाट धुके गेले चार महिने येथे असल्याने सूर्यदर्शन दुर्लभ झालेले आहे. परिणामी झाडांची पानगळ होण्याबरोबर रानातील गवतसुध्दा कुजू लागले आहे. 

सततच्या कोंदट वातावरणामुळे घरेही ओली झाली असून, घरातील कपडे व धान्याला बुरशी लागत आहे. अशा वातावरणामुळे आजारांचे प्रमाणही वाढले असून, वाहतुकीच्या साधनांअभावी दुर्गम भागातील लोकांना उपचारासाठी शहरापर्यंत जाणेही मुश्‍किल झाले आहे. 

डोंगरभागातील मुख्य व्यवसाय असलेला पशुपालन व्यवसायही अडचणीत आला आहे. जनावरांना दिवसभर शिवारात चरायला सोडायचे म्हटले तरी उघडीप नसल्याने गवताचे प्रमाण खूप कमी आहे, तर प्रचंड थंडीने वासरे, रेडके मृत्युमुखी पडत आहेत. 

जून महिन्यापासून सुरवात केलेल्या पावसाने सप्टेंबरच्या अगदी मध्यापर्यंत सतत चार महिने या भागाला झोडपल्याने लोक अक्षरशः वैतागली असून, पावसाची ही साडेसाती कधी संपणार, याकडे डोळे लावून बसली आहेत. 

 

कासच्या फुलांच्या हंगामालाही फटका 

कासच्या फुलांच्या हंगामालासुध्दा या पावसाचा फटका बसत असून, मोठ्या संख्येने येणारे पर्यटक अगदी तुरळक स्वरूपात गर्दी करत आहेत. त्यातच पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पठारावर फिरणे ही मुश्‍किल होत आहे. 
कास पाहायला येणारे पर्यटक आजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात; पण या खराब वातावरणाने पर्यटक ही लवकर माघारी फिरत असल्याने येथील पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall does not stop in Kas Plateau region