
हातातोंडाशी आलेली पिके पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया जाते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आरग (सांगली) : मिरज पूर्व भागात सोमवारी दिवसभर सूर्योदयापासूनच ढगाळ वातावरण आहे. बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांसह बागायतदारांना पुन्हा फटका बसला आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असला तरी कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी फवारणीच्या वाढत्या खर्चामुळे हवालदिल झाला आहे. तर हातातोंडाशी आलेली पिके पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया जाते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पूर्व भागात सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आणि शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली. वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ व रोगट वातावरण निर्माण झाले होते. द्राक्ष घडावर भुरी, दाऊनी, घड कुजण्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पुढील दोन दिवस असेच वातावरण राहिल्यास वातावरणातील बदलामुळे द्राक्ष, गहू, हरभरा पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
हेही वाचा - उसाच्या काटामारीने शेतकऱ्यांना कोटींचा फटका; सांगली जिल्ह्यात बेहिशेबी साखरेचा काळाबाजार
ज्वारी पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकांवर मावा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मावा रोगाच्या नियंत्रणासाठी व्हिडॉल फॉस दोन ते अडीच मिली प्रतिलीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे.
हरभरा पिक फ्लोरिंग स्टेजमध्ये असल्यास शंभर टक्के तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी टेंगाकोण्याझोल १ मिली प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. त्यामुळे कीड व रोग नियंत्रण मिळवता येईल. शेतकऱ्यांनी निराश न होता, उपाययोजना कराव्यात असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी
मिरज पूर्व भागात ज्वारी हरभरा गहू पिकाची पेरणी समाधानकारक झाली आहे. बदलत्या हवामानाचा ज्वारी पिकावर परिणाम होऊ शकतो. ज्वारी पिकांमध्ये मावा व हरभरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टळू शकते अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली.
हेही वाचा - डॉक्टरवर काळाने घातला घाला ; डंपर - चारचाकीच्या अपघातात जागीच ठार -
"ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा द्राक्ष बागेवर परिणाम झाला आहे. भुरी, दाऊनी, घड कुजणेचा प्रादुर्भाव होऊ शकतो. वाढ खुंटणार आहे उत्पादनावर परिणाम होणार आहे."
- राजू पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, आरग
संपादन - स्नेहल कदम