esakal | यंदा बेदाणा उत्पादन घटणार; शीतगृहात अवघा साठ टक्‍के माल; चांगल्या दराची अपेक्षा

बोलून बातमी शोधा

Raisins production will decline this year in Sangali; Only 60% of the goods in the cold storage; Expect good rates

सांगलीत अवकाळीची अवकृपा, उशिरा छाटण्यांमुळे यंदा बेदाणा उत्पादनात सुमारे 20 टक्‍के घट होण्याची शक्‍यता आहे.

यंदा बेदाणा उत्पादन घटणार; शीतगृहात अवघा साठ टक्‍के माल; चांगल्या दराची अपेक्षा
sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : अवकाळीची अवकृपा, उशिरा छाटण्यांमुळे यंदा बेदाणा उत्पादनात सुमारे 20 टक्‍के घट होण्याची शक्‍यता आहे. सद्यस्थितीत 60 टक्‍के शीतगृहे भरली असून त्यात एप्रिलअखेर आणखी 10 ते 15 टक्‍के वाढ होईल.

गेल्यावर्षीच्या उत्पादनाचा विचार केल्यास यंदा घट होणार, हे निश्‍चित. 
कोरोना काळात इम्युनिटी बूस्टर म्हणून गतवर्षीपासून बेदाण्याला मागणी आहे. तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत, विजापूर, पंढरपूर येथील मालाची मोठ्या प्रमाणात आवक होते. उच्चांकी उत्पादन झाल्यामुळे जिल्ह्यातील बेदाण्याने देशाचे मार्केट काबीज केले. 


गतवर्षी मार्केटिंग द्राक्षाचाही बेदाणा करण्याची वेळ आली. यंदा उत्पादनात लक्षणीय घट झाली. अतिवृष्टीमुळे काडी परिपक्‍व होण्यास अडचणी आल्या. बागेत द्राक्ष घडांची संख्या घटली. काही बागांना फळच आले नाही. अवकाळीमुळे छाटण्या लांबल्याचाही परिणाम उत्पादनावर झाला. टेबल ग्रेप्सलाही चांगला दर मिळाल्याने बेदाण्याची तयार द्राक्षेही बाजारात खपून गेली. शीतगृहात 60 टक्‍के बेदाणा शिल्लक आहे.

गतवर्षीपेक्षा उत्पादनात सरासरी 20 टक्‍के घट ठरलेली आहे. 10 ते 15 टक्‍केच माल शीतगृहात येण्याची शक्‍यता आहे. वातावरणाने साथ दिल्यास बेदाण्याची द्राक्षे टेबल ग्रेप्स म्हणूनही विकली जाऊ शकतात. सोलापूर, पंढरपुरात नव्याने शीतगृह झाल्याचा फटकाही सांगली-तासगावच्या शीतगृह चालकांना बसला. 

सामान्यांची बेदाण्यालाच पसंती

नोव्हेंबरमध्ये सुरु होणारा द्राक्ष हंगाम यंदा दीड-दोन महिने पुढे गेला. तोवर कोरोनाने डोके वर काढले. इम्युनिटी बूस्टर म्हणून बेदाण्याचे भाव वधारले. ही वाढ सुरुच आहे. शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारे धोरण ठेवावे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता बेदाणा शीतगृहात ठेवावा. उच्चांकी दर मिळण्याची खात्री आहे. स्वस्त ड्रायफ्रूट म्हणून सामान्यांची बेदाण्यालाच पसंती आहे. 

-सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी सांगली

संपादन : युवराज यादव