राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही; रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray has no right to name Balasaheb Ramdas athwale sangli

राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही; रामदास आठवले

सांगली : शिवसेनाप्रमुख बा्ळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. राज यांनी जनतेला भडकवण्याचे काम करू नये, अशी खोचक टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.सांगलीत पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, राज ठाकरेंची तुलना बाळासाहेब ठाकरेंशी केली जात आहे. मात्र त्यांनी बाळासाहेबांना धोका दिला. त्यांना त्रास दिला. त्यामुळे त्यांचे नाव घेण्याचा अधिकार राज ठाकरेंना नाही.

बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून ते पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा, निळा, पांढरा, भगवा अशा रंगाचा समावेश त्यांनी केला होता. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे त्यामुळे त्यांनी शांततेची भूमिका मांडावी असेही आठवले म्हणाले.ते म्हणाले, अजानचा त्रास वाटण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडेही शिवजयंती, भीमजयंती, गणेशोत्सव व अन्य धार्मिक सोहाळे, मिरवणुका यात वाद्य, भोंगे वापरतो. त्याचा कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. एकमेकांचा आदर करायला हवा.

ते म्हणाले, १९९२ नंतर गेल्या तीस वर्षात महाराष्ट्रात जातीय दंगल झालेली नाही. महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. घटनेला मानणारी आहे. त्यामुळे नेत्यांनी भडकवले तरी गैरसमज करून घेऊ नये. संविधानविरोधी कोणत्याही कृत्याचे समर्थन करणार नाही, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार अपयशी

मंत्री श्री. आठवले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. समाजात सामंजस्य निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत .त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे.

आठवले म्हणाले, मराठा, ब्राम्हण, दलित व अन्य जातींनाही मुख्यमंत्रीपद मिळण्याचा अधिकार आहे. पुढचे मुख्यमंत्री फडणवीस व्हावेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे. मी बौद्ध असलो तरी राज्यातील मराठा, ब्राम्हण समाजाने मला खूप आदर दिला. मीसुद्धा या सर्व समाजाचा आदर करतो. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे. त्याला आरपीआयचा पाठिंबा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

एल्गार परिषदेचा दंगलीशी संबंध नाही

श्री. आठवले म्हणाले, कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात नेमलेल्या आयोगाला शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्याविरोधात पुरावे मिळाले नसतील त्यामुळे त्यांचे नाव वगळले असावे. तसेच पुण्यातील एल्गार परिषदेचा या दंगलीशी संबंध नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.

राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यांना भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत येण्यास विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशवासियांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावर आठवले म्हणाले, बृजभूषण सिंह यांच्या भूमिकेस माझा पाठिंबा आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत जाऊ नये.

फडणवीस यांच्यामुळे दंगल आटोक्यात

कोरेगाव भीमा प्रकरणी उसळलेली दंगल तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आटोक्यात आली, असे श्री. आठवले म्हणाले. फडणवीस यांनी या प्रकरणाची योग्य हाताळणी केल्यामुळे राज्यात दंगल पसरली नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

काँग्रेसने बाहेर पडावे

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला डावलले जात असल्याची भावना त्यांच्या आमदारांमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा. अपमान सहन करत सरकारमध्ये राहू नये, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. काँग्रेसने पाठिंबा काढल्यास सरकार बनवण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले.

भाजप धर्मनिरपेक्ष पक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. नरेंद्र मोदी तसेच भाजप संविधानाच्या विरोधात नाहीत. भाजपा धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही. संविधानाला अजिबात गालबोट लागणार नाही यादृष्टीने माझा प्रयत्न आहे असे प्रतिपादन यावेळी श्री. आठवले यांनी केले.