राजाचे कुर्ले...फत्तेसिंह राजेभोसलेंचे गाव

सुहास शिंदे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुसेसावळी - सातारा राजधानीचे संस्थापक शंभूराजे पुत्र प्रथम शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्य अटकेपर्यंत पोचले. या शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक सरदार घराणी उदयास आली. यातील एक महत्त्वाचे घराणे म्हणजे खटाव तालुक्‍यातील राजाचे कुर्ले येथील फत्तेसिंह राजेभोसले यांचे घराणे. त्यांच्यामुळे हे गाव इतिहासकाळापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे.

पुसेसावळी - सातारा राजधानीचे संस्थापक शंभूराजे पुत्र प्रथम शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्य अटकेपर्यंत पोचले. या शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक सरदार घराणी उदयास आली. यातील एक महत्त्वाचे घराणे म्हणजे खटाव तालुक्‍यातील राजाचे कुर्ले येथील फत्तेसिंह राजेभोसले यांचे घराणे. त्यांच्यामुळे हे गाव इतिहासकाळापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे.

फत्तेसिंह यांच्याबद्दल इतिहासात अनेक घटना समोर येतात. शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणून त्यांचा उल्लेख आजही आपल्याला अनेक ऐतिहासिक पत्रांमधून वाचायला मिळतो. तसे जर पाहिले तर फत्तेसिंह भोसले यांचे मूळ घराणे सरदार लोखंडे यांचे. परंतु, एका युद्धामध्ये लढताना फत्तेसिंह यांचे वडील कामी आल्यामुळे फत्तेसिंह यांची पुढील सर्व जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. त्यानंतर फत्तेसिंह राजेभोसले म्हणून ते इतिहासात प्रसिद्ध झाले. शाहू छत्रपतींनी त्यांना अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली आणि त्यांची योग्य व्यवस्था केली. पुढे त्यांच्या मुलांमध्ये बखेडा निर्माण होऊन त्यांच्या तीन शाखा वेगवेगळ्या प्रांतावर आपापल्या परिने वर्चस्व गाजवू लागल्या. अक्कलकोट, पिलीव आणि राजाचे कुर्ले येथे फत्तेसिंह राजेभोसले यांचे पुढील वारसदार राहू लागले. राजाचे कुर्ले या गावी त्यांच्या घराण्याच्या अनेक आठवणी आजही आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामधील एक महत्त्वाची वास्तू म्हणजे राजेभोसले यांचा भुईकोट किल्ला (राजवाडा) होय. जवळपास तीन ते चार एकर परिसरात हा भुईकोट किल्ला बांधण्यात आला होता. चारी बाजूला सुमारे ३० फूट उंचीचे भक्कम बुरुज आणि भव्य असे प्रवेशद्वार या राजवाड्यास होते. आजही या भुईकोट किल्ल्याचे दोन बुरुज आपल्या धन्याच्या पराक्रमाची साक्ष देत खंबीरपणे उभे आहेत. प्रवेशद्वाराची आणि आज या राजवाड्याची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली असून, राजेभोसले घराण्यातील दोन बंधू आजही या ठिकाणी वास्तव्यास आहेत. 

या घराण्याचे सोयरसंबंध महाराष्ट्रातील अनेक मातब्बर घराण्यांशी असून, ग्वाल्हेर, बडोदा, म्हसवड अशा संस्थानिक घराण्यांत त्यांचे पाहुणे आहेत. याच गावात राजेभोसले यांचे सरदार माने यांचे चार दगडी वाडे आपल्याला पाहावयास मिळतात. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले हे वाडे आजही सुस्थितीमध्ये आहेत.

इतिहास अभ्यासकांसाठी आकर्षणाचे ठिकाण 
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड-फलटण मार्गावर असणारे हे ऐतिहासिक गाव आणि येथील इतिहासकालीन वास्तू म्हणजे इतिहास अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरले आहे.

Web Title: Rajache Kurle Village History Fattesinh Rajebhosale