काळजाला भिडतेय स्मशानातील 'माया'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

"स्मशान" हा शब्द सर्वांचा काळजाचा ठोका चुकवतो. तेथील भीतीदायक वातावरण अथवा आक्राळविक्राळ चित्र डोळ्यापुढे उभे राहते. पण सातारामधील कैलास स्मशानभूमीतील आजच्या प्रसंगाने त्यावर मात केली. 

सातारा : मुला- नातवंडाची व्याकूळता आई असो अथवा आजी कोणालाच पाहवत नाही. मग घर असो नाहीतर स्मशानभूमी. याची अनुभूती सातारकरांनी आज घेतली. आप्ताच्या सावडण्याच्या विधीवेळी नातवंडांची भुकेने झालेली तळमळ पाहून आजीने स्मशानभूमीची पर्वाच केली नाही. साताऱ्याच्या कैलास स्मशानभूमीत आजीने रुमालावर ठेवलेले चिरमुरे तीन बालके निरागासपणे खात राहिली. स्मशानातील हे दृष्य पाहून अनेकांचे मन हेलावलेही असेल; परंतु आजीची माया... 

साताऱ्यातील संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमी सातारा शहरासह नजीकच्या विविध ग्रामपंचायती, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे अंत्यविधी होत असतात. अंत्यविधीनंतर सावडण्याचा विधीही याच ठिकाणी केले जातात. ही स्मशानभूमी सातारा शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने विकसित केली आहे. आजही स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती कोणत्याही शासकीय मदतीशिवाय ट्रस्टच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्यातून केली जाते. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे हे स्वतः दररोज सकाळी स्मशानभूमीत जातात. तेथील व्यवस्थेची पाहणी करून दैनंदिन कामकाजाबाबत सूचना करतात. येथे दररोज केलेल्या जाणाऱ्या स्वच्छतेमुळे, विविध छोटे खानी वृक्षांमुळे तुम्ही कैलास स्मशानभूमी आला आहात असे वाटतच नाही. 

जरुर वाचा - लोभी माणसांनी भरलेल्या जगात...हे काय घडले

आज (शुक्रवार) नेहमीप्रमाणे स्मशानभूमीत नागरिकांची ये-जा सुरू होती. कोणाचा अंत्यविधी सुरू होता तर कोणाचे सावडण्याचे विधी. या स्मशानभूमीतील एका ठिकाणी मात्र एक आजीबाई आपल्या नातवंडांबरोबर बैठक मारून बसल्या होत्या. त्यांची नातवंडे रुमालावर ठेवलेली चिरमुरे मुठी मुठीने खात होती. मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आजीबाई त्यांच्या वाट्याला आलेले दुःख काही काळ होईना विसरून गेल्या. दुसरीकडे मुले मात्र चिरमुरे फस्त करण्यात रमून गेली होती, की जणू बागेत बागडायलाच आल्याप्रमाणे. स्मशानभूमीतील हे दृष्य पाहून तेथे उपस्थित असणाऱ्या राजेंद्र चोरगे यांना राहवले नाही. त्यांनी आजीबाईंची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तेव्हा त्या आजीबाई आप्तस्वकीयांच्या सावडणे विधीस आल्या होत्या हे त्यांना समजले. नातवंडाच्या भुकेची तळमळ आणि स्माशनभूमीतीलही अल्हाददायक असे वातावरणामुळे आजींची कृती कालचं दुःख पाठीवर टाकून उद्याची उमेद निर्माण करणारे ठरल्याचे चोरगे यांनी नमूद केले.
 
हेही वाचा म्हणून फलटणकरांनी घुमवला जय महाराष्ट्राचा नारा

वाचा : धाडसी युवकांमुळे शिराळ्याच्या पाटलांचा वाचला प्राण

कैलास स्मशानभूमीतून बाहेर पडल्यानंतरही चोरगे यांच्या डोळ्यासमोरून आजी व नातवंडे काही केल्या जात नव्हते. अखेर आपल्या कार्यालयात पोचल्यानंतर चोरगेंनी आपले दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून स्मशानभूमीतील घटना पहिली डायरीत लिहिली. त्यामध्ये ते लिहितात जन पळभर म्हणतील हाय हाय.... हे जसं एकीकडं खरं वाटतं तसंच दुःखाला कवटाळून राहणं हे त्याहून अधिक विदारक असतं. निसर्ग कालचं दुःख पाठीवर टाकून उद्याची उमेद निर्माण करत असतो; पण आपण त्या निसर्गचक्राला तसं वातावरण देतो का? आज (शुक्रवार) सकाळी साताऱ्याच्या कैलास स्मशानभूमीतलं हे चित्र (सोबत छायाचित्र जोडले) आहे. एक आजीबाई आपल्या नातवंडांना अंथरून घालून चिरमुरे खायला देत रमून रंगून गेली होती. जणू बागेत बागडायला आल्यासारखे भाव त्या नातवंडांच्या चेहऱ्यावर होते. 
स्मशानभूमीत आलेत म्हणजे कोणी आप्तस्वकीय गेले असणार ना, म्हणून चौकशी केली काही काळासाठी त्यांचा होऊन गेलो. तेव्हा कळले आप्तस्वकीय जाऊन आज सावडणे विधी होता. दुःख तर होतंच; पण स्मशानातली भीती किंवा स्मशानातलं वैराग्य त्यांच्या मनाला शिवलं नव्हतं. 
"स्मशान" हा शब्दही काळजाचा ठोका चुकवतो. ते भीतीदायक वातावरण. ते आक्राळविक्राळ चित्र डोळ्यापुढे उभे करतो; पण सातारकरांच्या साथीने बालाजी ट्रस्टने साताऱ्यात उभारलेल्या कैलास स्मशानभूमीत एक आजीबाई आपल्या नातवंडांच्यात बागडू शकते, इतकं वातावरण निर्माण करू शकलो याचा अभिमान वाटला. आप्तस्वकीयांच्या कार्याला आलेल्या त्या चिमुरड्यानां काय माहीत कोण कसलं कार्य ? भल्या पहाटे घरून आलेली लेकरं भुकेनं व्याकुळ झालेली पाहून आजींनी थेट चटई अंथरली आणि त्यांच्यात रममाण झाली. 

नातवंड म्हणजे दुधावरची साय. भोगला आलेलं कालचं दुःख आज विरून गेलं पाहिजे हेच त्या आजींना शिकवायचे असावे आणि त्यासाठी समशानातही ते पोषक वातावरण करू शकलोय, हे आज मनोमन पटलं. 
- राजेंद्र चोरगे, संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी चॅरीटेबल ट्रस्ट, सातारा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Chorge Expressed Satara Cemetery Expirence

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: