राजू शेट्टी औषधांचे कॅन घेऊन पोहचले इस्लामपुरात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

माजी खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजीतून औषध मिळवले आणि तब्बल 325 लिटर औषधांचे कॅन घेऊन ते स्वतः इस्लामपुरात पोहोचले.

सांगली ः इस्लामपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 25 वर पोहचली आहे. बाधित कुटुंबाच्या संपर्कात अजून 337 लोक आले आहेत.

त्यामुळे हे शहर आता भयाच्या छायेखाली आहे. तेथे तीन दिवस पूर्ण लॉक डाऊन करण्यात आले आहे. अशावेळी शहरात औषध फवारणी ही अत्यावश्‍यक बनली आहे. त्यासाठी सोडियम हाइपोक्‍लोराईट हे औषधच इस्लामपूर नगरपालिकेकडे उपलब्ध नव्हते. ही माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजीतून औषध मिळवले आणि तब्बल 325 लिटर औषधांचे कॅन घेऊन ते स्वतः इस्लामपुरात पोहोचले.

इस्लामपुरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी शहरातील स्थितीबाबत चर्चा केली. शहरात भितीचे वातावरण आहे. 337 लोक कोरोनाग्रस्त कुटुंबाची संपर्कात आले आहेत. त्यात इस्लामपुरातील लोकांची संख्या अधिक आहे. त्यांना घरातच थांबण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस इस्लामपूर शहरात चिटपाखरू दिसणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशावेळी शहरात औषध फवारणी करणे आणि विषाणूचा प्रसार रोखणे मोठे आव्हान बनले आहे.

त्यासाठी चीनमधील वुहान प्रांतात केलेल्या उपाययोजनांप्रमाणे उपाय योजना करणे अत्यावश्‍यक होते. त्यात औषध फवारणी हा महत्वाचा भाग होता. त्यासाठी पुरेशा प्रमाणात सोडियम हायपोक्‍लोराईड उपलब्ध करण्याचे आव्हान होते. त्याबाबत राजू शेट्टी यांना माहिती मिळतातच त्यांनी तातडीने नियोजन सुरु केले.

शेट्टी यांनी इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत लोकांशी संपर्क साधला. त्यांनी हे औषध उपलब्ध असल्याचे सांगताच श्री. शेट्टी इचलकरंजीला रवाना झाले. तेथे औषधाचे कॅन ताब्यात घेतले आणि तडक इस्लामपूर गाठले. तेथे नगरपालिकेच्या ताब्यात हे औषध देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. औषध फवारणीसह लॉक डाऊनचे नियोजन जाणून घेतले. आणखी काही मदत लागली तर तातडीने कळवा, मी हजर आहे, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty arrives in Islampur with a can of medicine