कडकनाथच्या आडोशाने शेट्टींकडून मी टार्गेट : खोत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

शेतकऱ्यांची दिशाभूल करुन आंदोलन करायचं. स्वतः सेटलमेंट करुन पोळी भाजून घ्यायची ही माजी खासदार राजू शेट्टींची स्टाईलच आहे. त्यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

इस्लामपूर : शेतकऱ्यांची दिशाभूल करुन आंदोलन करायचं. स्वतः सेटलमेंट करुन पोळी भाजून घ्यायची ही माजी खासदार राजू शेट्टींची स्टाईलच आहे. त्यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. कडकनाथ कोंबडीच्या आडोशाने मला टार्गेट करणे सुरू आहे, असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले,""कडकनाथ कोंबडी पालन प्रकरणात फसवणूक झालेल्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहोत. परंतु कडकनाथच्या आडोशाने कोणी राजकीय पोळी भाजून घेत असेल तर तोंडावर बोट ठेऊन गप्प बसणार नाही. या प्रकरणात आमचा किंचतही संबंध नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो असला म्हणजे दोषी ठरत असून तर शेट्टींचेही त्यांच्याबरोबर खूप फोटो आहेत.

कडकनाथ प्रकरणात कागदोपत्री एखादा जरी पुरावा मिळाला, तरी त्यांनी तो सादर करावा. दोषी असलो तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र कडकनाथच्या आडून निंदा-नालस्ती, सदाभाऊंची बदनामी करणे शोभत नाही.

शेट्टींचा इतिहास समाजाला माहित आहे. ते भाजपमध्ये असताना फायदा झाला नाही म्हणून बाहेर पडले. राष्ट्रवादीने मंत्री केले नाही म्हणून बाहेर पडलेत. केवळ स्वार्थ हाच हेतू त्यांचा आहे. तो सर्वांना समजला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूकीत व विधानसभा निवडणूकीत त्यांच्या संघटनेला पराभव पत्करावा लागला. मंत्रीपद नाही म्हणून ते नाराज आहेत. नाराजी लपवण्यासाठी व चर्चेत राहण्यासाठी मुद्दा असावा म्हणून कडकनाथच्या आडोशाने त्यांनी आरोप सुरु केले आहेत.'' 

ते म्हणाले,""कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा प्रकरणी सर्वात आधी मी स्वतः तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी व्हावी म्हणून लेखी पत्र दिले. त्याच कालावधीत मंत्रीपद मिळाल्यामुळे स्वकीय व बाहेरील लोकांच्या पोटात दुखू लागले. राजकीय वारसा नसलेला माणूस नेता झाला म्हणून त्यांनी कडकनाथचा गवगवा करीत माडझ्या पाठीशी लागले आहेत. माझा व कुटुंबीपैकी कोणाची काडीमात्र संबंध नाही. कोणाचा फोटो त्या लोकांसोबत असला म्हणून दोषी ठरत नाही.

काहींनी कुटुंबाला बदनाम करण्याचा कट रचला आहे. सागर खोतचा या प्रकरणाशी संबंध आहे,अशी अफवा पसरवण्चे काम केले. शेट्टींनी माझ्या कुटुंबाला वादात आणू नये.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju shetty targeting me through Kadaknath scam : Sadabhau Khot