रांगणा किल्ला अतिक्रमणापासून रोखला

सुधाकर काशीद - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

कोल्हापूर - ज्या शिवरायांनी कधी मुहूर्त बघून किल्ल्याची बांधणी, मुहूर्त बघून लढाई केली नाही, अशा शिवरायांच्या रांगणा किल्ल्यावर बुवाबाजीचा मठ उभा करण्याचा प्रयत्न इतिहास व निसर्गप्रेमी तरुणांनी हाणून पाडला. भुदरगड तालुक्‍यातील पारगावजवळच्या या रांगणा किल्ल्यावरील प्रचित मंदिर या तरुणांनी श्रमदानाने पुन्हा उभे केले होते. निसर्ग पर्यटनासाठी येणाऱ्यांना ते निवाऱ्याचे एक चांगले स्थान होते. पण तीन-चार महिन्यांपूर्वी तेथे एक साधू येऊन राहू लागला व बघता बघता त्याचा ‘दरबार’ भरू लागला. भविष्याचा अंदाज घेत, या तरुणांनी विरोधाचा पवित्रा घेतला. साधूला गडावरून गाशा गुंडाळावा लागला.

येथील निसर्गवेध संस्थेच्या निसर्ग व इतिहासप्रेमी तरुणांनी अशा वेगळ्या पद्धतीने या किल्ल्याचे संवर्धन करीत किल्ला हा इतिहासाचेच प्रतीक राहिला पाहिजे, याचा संदेश दिला. पाटगावपासून पुढे गर्द जंगलाची वाट पार करून पुढे गेले की रांगणा किल्ला लागतो. या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की तो ११ व्या शतकात भोज शिलाहार काळात बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या देखभालीसाठी पाच हजार होनाची तरतूद केल्याचा अस्सल कागद (दफ्तर) कोल्हापूर पुराभिलेखागार कार्यालयात आजही आहे.

या किल्ल्यावर शिवाजी महाराज तीन वेळा आल्याचा इतिहास आहे. जंगल पर्यावरणाच्या दृष्टीने तर भरगच्च असे जंगलाचे वैविध्य आहे. सह्याद्रीतील ‘हॉट स्पॉट’ असेच या किल्ल्याचे वर्णन आहे. हा किल्ला दणदणीत, खणखणीत; पण पन्हाळा, विशाळगड म्हणजेच इतिहास अशा समजुतीमुळे हा किल्ला दुर्लक्षित राहिला. किल्ल्याच्या आसपासच्या गावातील लोकांनी किल्ल्यावरील रांगणाई देवीच्या यात्रा, पूजेच्या निमित्ताने किल्ल्यावर राबता ठेवला. 

निसर्गवेध संस्थेच्या तरुणांनी मात्र अगदी नियोजनबद्धपणे या किल्ल्याची देखभाल सुरू केली. आपण इच्छा असूनही राज्यातल्या सर्व गड-किल्ल्याची देखभाल करू शकरणार नाही. पण निदान एक किल्ला तरी आपल्या ताकदीने जपू हा विचार जपत त्यांनी रांगणा किल्ल्याचा इतिहास पुन्हा जिवंत केला.

पण तीन-चार महिन्यांपूर्वी किल्ल्यावरील मंदिरात साधू येऊन राहू लागला व तेथे दरबार भरू लागला. हा किल्ला शिवरायांच्या इतिहासाने पावन झालेला. पण तेथे साधूच्या नावाचा दबदबा निर्माण केला जाऊ लागला. त्यामुळे हे तरुण अस्वस्थ झाले. त्यांनी साधूला विनंती केली. काही दिवसांची मुदत दिली. दुसरीकडे कोठेही तुम्ही तुमचे धार्मिक स्थान उभारा. पण इतिहासाचा साक्षीदार असलेल्या  किल्ल्यावर नवीन काही सुरू करण्यास त्यांनी विरोध केला व साधूला गड सोडावा लागला.

निसर्गवेध परिवाराचे अध्यक्ष व गड-किल्ले संरक्षण संवर्धन समितीचे सदस्य भगवान चिले, अभिजित नरके, सागर मोहिते, विनायक हिरेमठ, आशीष कोरगावकर, गोपी नार्वेकर, गुरुनाथ वास्कर, कांतिभाई पटेल, अवधूत पाटील, अभिजित दुर्गुळे, विश्‍वनाथ चिले, राम वास्कर, सुशांत मालंडकर, अनिल माने, सुहास पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

नियोजनबद्धपणे देखभाल
निसर्गवेध संस्थेच्या तरुणांनी मात्र अगदी नियोजनबद्धपणे या किल्ल्याची देखभाल सुरू केली. त्यांनी अक्षरशः डोक्‍यावरून, खांद्यावरून वाळू-सिमेंटची पोती नेऊन किल्ल्यावरील ढासळलेले प्राचीन मंदिर, दीपमाळ, गणेश मंदिर, कोकण यशवंत व चिलखती बुरूज, हत्ती सोंड्याची समाधी अशी ठिकाणे पुन्हा तिथल्याच पडलेल्या साहित्यात बांधली. बांधलेल्या चिऱ्यावर पाणी मारण्यासाठी रोज दोन कार्यकर्ते किल्ल्यावर जात राहिले.

Web Title: Rangana fort