esakal | ब्रेकिंग: राणी चन्नमा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; लवकरच तारीख जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

rani chennama univercity

ब्रेकिंग: राणी चन्नमा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; लवकरच तारीख जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयू) पदवी, पदव्युत्तर आणि एमबीए परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. परीवहन कर्मचाऱ्यांचा संप अध्यापही सुरु असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे एका पत्रकात आरसीयुने नमुद केले आहे. परीक्षांच्या तारखांत वारंवार बदल होत असल्याने विद्यार्थ्यांतुनही नाराजी दिसून येत आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय आरसीयुकडेही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडूही निर्णय घेतले जात आहेत.

परिवहन महामंडळाचे कर्मचारी ७ एप्रिलपासून संपावर आहेत. त्यामुळे आरसीयूने यापुर्वी ७ ते ९ एप्रिलपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा आणखी एक तारीख जाहीर करून पदवीच्या ७ एप्रिलपासून १२ एप्रिलपर्यंत होणाऱ्या परीक्षा १९ एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पदव्युत्तरच्या ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत व एमबीए परीक्षेचे ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ ते ४ मेपर्यंत होणार असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले होते. मात्र, अद्यापही परीवहन संप मिटला नसल्याने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासंबंधी लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

विद्यापीठाने शनिवारी (ता. १७) जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पदवीची १, ३ व ५ वी सेमीस्टर, पदव्युत्तरची १ व तिसरी सेमिस्टर व एमबीएच्या तिसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्ह्यात परिवहनचा संप सुरु असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे पत्रकात नमुद केले आहे.

Edited By- Archana Banage