इस्लामपुरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार

धर्मवीर पाटील
Tuesday, 15 December 2020

इस्लामपूर  येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज कांबळे (रा. खरसुंडी, ता. आटपाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून, आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 19 डिसेंबरपर्यंत सहा दिवस पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडिता गेल्या दीड वर्षापासून इस्लामपुरात अभ्यास व सरावसाठी तीन मैत्रिणींसह भाड्याच्या खोलीत राहात आहे. चार महिन्यांपूर्वी मनोजनेही त्याचठिकाणी प्रवेश घेतला होता. त्यांची आधीपासून ओळख होती.

12 डिसेंबरला मनोजने त्या मुलीचा फोन काढून घेतला. हा प्रकार तिने मैत्रिणींना व मित्रांना सांगितला. मोबाईलमधील संभाषणाचे रेकॉर्डिंग सर्वांना पाठवून बदनामी करण्याची धमकी संशयिताने दिली. 

दबावामुळे दुसऱ्या दिवशी 13 डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास पीडिता मोबाईल आणण्यासाठी गेली असता मनोजने हाताला धरले. त्यानंतर लैंगिक अत्याचार केले. रेकॉर्डिंगही केले होते.

त्यानंतर घडला प्रकार कुणाला सांगितला, तर हे रेकॉर्डिंग मैत्रिणी, मित्र आणि तिच्या घरातील सर्वांना पाठवून देईन आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेला सर्व प्रकार मैत्रिणी व मित्रांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape of a young woman studying for a competitive exam in Islampur