आजारी नागरिकांची चाचणी होणार रॅपिड अँटीजेन चाचणी

बलराज पवार
Tuesday, 21 July 2020

सांगली : महापालिका क्षेत्रातील कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षांवरील नागरिक तसेच बहुविध आजार असणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे.

सांगली : महापालिका क्षेत्रातील कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षांवरील नागरिक तसेच बहुविध आजार असणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यास संबंधित रुग्णास तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करुन पुढील उपचार केले जाणार आहेत. 
महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.

त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने घर टू घर सर्व्हे करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी आणि त्यांच्या आजाराची माहिती घेण्यात येत आहे. त्यातच आता रॅपिड अँटीजेन चाचणीही करण्यात येणार आहे. 50 वर्षांवरील नागरिक तसेच बहुविध आजार असणाऱ्या व्यक्तींची चाचणी होणार आहे. या चाचणीमुळे अवघ्या अर्ध्या तासात अहवाल मिळून नागरिकांना कोरोना आहे की नाही ते स्पष्ट होईल. त्यामुळे अहवाल पॉझिटीव्ह आल्यास या संबंधितांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. 

महापालिकेचे पथक घरी सर्व्हेसाठी आल्यावर त्यांना आवश्‍यक माहिती द्यावी. तसेच घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांची माहिती द्यावी. पथकाने अँटीजेन चाचणी करण्याची विनंती केल्यास त्यांना सहकार्य करावे. विरोध करु नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाला दोन दिवसांपुर्वीच जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी रॅपिड अँटीजेन चाचणीचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर आता महापालिका क्षेत्रात या चाचण्या करण्यात येत आहेत. महापालिकेकडे चार हजार रॅपिड अँटीजेन चाचणीचे कीट तयार आहेत. आणखी दहा हजार कीट खरेदी करण्याचे सुतोवाच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

129 मध्ये दोन पॉझिटीव्ह 
महापालिकेच्या पथकाने आज 129 रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या. यात दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत. त्यांना तात्काळ कोविड केअर सेंटरला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid antigen testing will be performed on sick citizens