सांगलीत आता ग्रामीण भागातही होणार रॅपिड ऍन्टीजेन चाचणी

विष्णू मोहिते
Friday, 31 July 2020

कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असताना तत्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी शहरीसह आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रॅपिड ऍन्टीजेन चाचणी करण्यात येईल.

सांगली : कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असताना तत्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी शहरीसह आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रॅपिड ऍन्टीजेन चाचणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दहा हजार चाचण्या घेतल्या जातील. दरम्यान, जिल्ह्यातील मृत्यू दर हा एक टक्‍क्‍याच्या आत येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी जनतेची जबाबदारी वाढणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर यासह खबरदारी घेणे गरजेचे आहे. रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट आवश्‍यक आहे. शहरी भागात रॅपिड ऍन्टीजेन चाचणी सुरु करण्यात आली. ग्रामीण भागातही अशी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही लवकरच सुरु केली जाईल. शहरी आणि ग्रामीण भागात मिळून 20 हजार टेस्ट घेतल्या जातील. 

लोकांनी कोरोनाची लक्षणे जाणवली तर तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. वेळेत उपचार सुरू झाले तर धोका टळू शकतो. बरेच लोक दुर्लक्ष करतात. किंवा त्रासाकडे दुर्लक्ष करतात. कॅन्सर, रक्तदाब, शुगर, दमा असे आजार असणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 

डॉ. चौधरी म्हणाले,""जिल्ह्यात सध्या 70 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील 25 जणांचे मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक मृत्यू 24 किंवा 48 तासांत झाले आहेत. याचा अर्थ आजाराकडे दुर्लक्ष करणे, अंगावर काढणे यामुळे स्थिती गंभीर बनते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. वेळेत उपचार सुरु होणे गरजेचे आहे. मृत्यू दर 1 टक्‍क्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 50 वर्षांच्या वरील 60 वर्षे वयाच्या लोकांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात अशी संख्या 2 लाख 60 हजार आहे. 

उपचार मोफत... 
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""उत्पन्नाची अट काढून सर्वांवर महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत कोरोनाचे उपचार करण्यात येणार आहेत. शासनाने सात ते आठ पॅकेज केलेत. त्यात रूग्णाचे उपचार बसत नसतील तरच खासगी रूग्णालयांना पैसे घेता येतील. अशा प्रत्येक खासगी रूग्णालयात शासनाकडून दोन माणसांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी रूग्णालयात भेटी देण्याच्या सूचना टास्क फोर्सला देण्यात आल्या आहेत. 
 

जिल्हाधिकारी म्हणाले... 
- समुह प्रतिकार शक्ती चाचणी अशक्‍य 
- मिरज शासकीय रुग्णालयात आयसीयूचे 110 बेडस्‌ 
- खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दर निश्‍चित 
- महात्मा फुले योजनेतूनही मोफत उपचार 
- त्यांच्या निकषात न बसणाऱ्यांना खासगी दराने उपचार 
- प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नोलड अधिकारी, लेखा व्यक्तींची नेमणूक 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid antigen testing will now in rural areas in Sangli