राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदतकार्यात "दक्ष' : टाळेबंदीत 25 हजार जणांची भागवली भूक 

अजित कुलकर्णी
शनिवार, 30 मे 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांनी जात, पात, धर्म, प्रदेश न पाहता कुणीही उपाशी राहू नये, याची दक्षता घेतली. तीही थोडीथोडकी नाही तर दोन महिने. तब्बल 25 हजारहून अधिक भुकेल्या पोटांची आग शमवत दोन महिने अन्नयज्ञ अखंडपणे सुरू आहे. 

सांगली : आपत्ती अन्‌ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे गेल्या अनेक दशकांपासूनचे समीकरण. चक्रीवादळ, भूकंप, अपघात, महापूर, सुनामी असो की महामारी, संघाचे मदतकार्य पोहोचत असते. माणुसकीच्या नात्याने काम करून आपत्तीकाळात लोकांना दिलासा देणे ही खरेतर आरएसएसची शिकवण. आंतरराष्ट्रीय आपत्ती असणाऱ्या कोरोनाच्या भीतीने सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) पाळण्याचा फंडा देशभर निघाला.

अशाही परिस्थितीत स्वयंसेवकांनी जात, पात, धर्म, प्रदेश न पाहता कुणीही उपाशी राहू नये, याची दक्षता घेतली. तीही थोडीथोडकी नाही तर दोन महिने. तब्बल 25 हजारहून अधिक भुकेल्या पोटांची आग शमवत दोन महिने अन्नयज्ञ अखंडपणे सुरू आहे. 

टाळेबंदीमुळे आपत्तकाळात झटणाऱ्या स्वयंसेवकांवर मर्यादा आल्या. सांगलीत गतवर्षी महापुरावेळी संघाने सुरू ठेवलेले अन्नछत्र पूरग्रस्तांसाठी "मसिहा' बनले होते. शिधा, औषधांसह इतर मदतीचे वाटपही आदर्शवत होते. त्याच धर्तीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर, अनाथ, बेघर, बेवारस, अपंग, परप्रांतीय कामगारांना शिधा वाटपाची संकल्पना पुढे आली. संघाच्या आपत्तकाळातील मदत कार्याची महती असल्याने साहजिकच त्याला प्रशासनानेही हिरवा कंदील दाखवला.

28 मार्चपासून गरजूंना प्रत्यक्ष जाग्यावर जेवणाचे पॅकेट पोहोच करण्याच्या कामाला प्रारंभ झाला. दररोज किमान 600 लोकांना दोन्हीवेळचे जेवण एकाचवेळी दिले जात होते. गेल्या दोन महिन्यांत 4 हजार 83 कुटुंबांपर्यंत शिधाकीट पोहोच केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व्हे करणे, जबाबदारी निश्‍चिती, वाहनव्यवस्था, निधी संकलन, शिधा संकलन, जेवण पोहोच करणे ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. 

फोटोसेशन, स्टंटबाजीला फाटा... 
संघाच्या शिस्तबद्ध यंत्रणेला यावेळी संचारबंदीमुळे खूपच मर्यादा आल्या. गरजूंना खरोखरच अडला-नडला आहे का, याची खात्री करुनच तेथे मदत पोहोच केली जाते. इतर राजकीय पक्ष, संघटनांसारखे फोटोसेशन, स्टंटबाजीला पूर्णत: फाटा देत मदतीचा हा यज्ञ अखंड सुरू आहे. जिल्हा संघ चालक विलास चौथाई, कार्यवाह नितीन देशमाने, राष्ट्रीय संघटन मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र तेलंग, सचिव धनंजय दीक्षित, राजीव शिंदे यासारख्या मंडळींचे हात अहोरात्र कष्टत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashtriya Swayamsevak Sangh is Daksha in relief work