भोजापूरच्या पाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर रस्तारोको

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे आश्वासनानंतर अर्ध्यातासाने आंदोलन मागे घेण्यात आले.

तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे आश्वासनानंतर अर्ध्यातासाने आंदोलन मागे घेण्यात आले.

निमोण भागात पावसाअभावी खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची टाळाटाळ सुरु आहे. त्यामुळे या भागातील कुपनलिका, विहिरींचे उद्भव कोरडे पडले. दुष्काळी स्थिती लक्षात घेता भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी यावेळी इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी केली. संदीप सांगळे, पांडुरंग गोमासे यांची भाषणे झाली. 

भोजापूर पाटपाणी संघर्ष समितीचे इंजि. हरिश्चंद्र चकोर, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे, शिवसेना तालुका उपप्रमुख संदीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात मगेश वालझाडे, मुरलीधर चकोर, भाऊपाटील कोटकर, पांडुरंग गोमासे, पोपट घुगे सहित शेतकरी सहभागी झाले होते.

सबंधित अधिकाऱ्यांनी पाणीप्रश्नी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलकांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक अर्धाताप ठप्प झाली होती.

प्रशासनाची तयारी 
रस्तारोकोच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली होती. रस्तारोको सुरु होण्यापूर्वीच तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर हे आंदोलन सुरु होण्यापूर्वीच पोलीस फौजफाटा घेवून आलेले होते. प्रशासनाच्या तयारीने आंदोलन लांबले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rastaroko on the Nashik-Pune highway for Bhojapur water